मुंबई : छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयातील करिअरला प्रारंभ करणाऱ्या सुशांत सिंह राजपूत याचा आज ३३ वा वाढदिवस... सुशांतनं झी टीव्हीच्या 'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमातून घराघरात एन्ट्री केली. परंतु, खूपच कमी लोकांना हे माहीत असेल की अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सुशांतनं ११ नॅशनल इंजिनिअरिंग परीक्षा पास केल्या होत्या. सुशांतनं २००६ साली झालेल्या राष्ट्रकूल खेळांदरम्यान एक शानदार परफॉर्मन्सही दिला होता. सुशांतचा जन्म बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरातला... सुशांतचे वडील सरकारी कर्मचारी होते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतनं पाटण्यातील कार्मेल स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २००३ मध्ये एआयईईच्या परीक्षा दिल्या. यामध्ये त्यानं संपूर्ण भारतात सातवी रँक मिळवली. सुशांतनं दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. इथंच त्यानं डान्ससाठी कोरिओग्राफर श्यामक डावर आणि थिएटरसाठी जॉन बॅरी यांचा क्लास सुरू केला. तीन वर्षांपर्यंत इंजिनिअरिंग केल्यानंतर सुशांतनं शिक्षण सोडून मुंबईला कूच केली... आणि अभिनय क्षेत्रात स्वत:ला आजमावणं सुरू केलं.



सुशांतला सर्वात अगोदर संधी दिली ती छोट्या पडद्यानं... 'पवित्र रिश्ता' या कार्यक्रमानं त्याच्या करिअरला साथ दिली. तसंच त्याच्यासोबत या सीरिअलमध्ये काम करणाऱ्या मुख्य अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत त्याच्या खऱ्या आयुष्यातील ताराही जुळल्या. दीर्घकाळ अंकितासोबत नात्यात राहिल्यानंतर २०१६ मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. 


'पवित्र रिश्ता'नंतर 'किस देस मे है मेरा दिल'मध्येही तो दिसला. त्यानंतर अनेक रिअॅलिटी शोमध्येही त्यानं चार चाँद लावले... आणि अखेर त्याला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळालीच. 'काय पो छे' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये त्यानं पहिलं पाऊल टाकलं... या सिनेमातील अभिनयासाठी सुशांतचं खूप कौतुकही झालं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके, डेटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी, एम एस धोनी आणि नुकताच सारा अली खानसोबत आलेला 'केदारनाथ' असे अनेक सिनेमे त्यानं आपल्या नावावर केले. 



अंकिताशी ब्रेकअपनंतर सुशांतचं नाव कृती सेननसोबतही जोडलं गेलं. दोघं अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करतात. नुकतीच सुशांतनं आपल्याला १२ सिनेमांची ऑफर मिळाल्याची खुशखबरही त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवली होती. सुशांतचा आगामी सिनेमा 'सोनचिडिया'चा ट्रेलर ७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा ८ फेब्रुवारी रोजी मोठ्या पदड्यावर दाखल होणार आहे.