मुंबई : अभिनेता  इरफान खान (Irrfan Khan) यांनी कायमच त्यांच्या अभिनयानं प्रत्येक कलाकृती समृद्ध केली. दमदार अभिनय आणि प्रेक्षकांच्या काळजाशी जोडलं जाणारं नातं हे त्यांचे स्वभावविशेष. या अवलियानं फार लवकरच आपल्यातून कायमची एक्झिट घेतली. पण, आजही ते प्रत्येकाच्याच लक्षात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नी सुतापा, मुलगा बाबिल हे कायमच इरफान यांचं अस्तित्वं टिकवताना दिसतात. 


इरफान खान आणि त्यांच्या पत्नी सुतापा यांचं नातंही कायम हेवा वाटेल अशाच स्वरुपात सर्वांसमोर आलं. 


सहजीवनाच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मात्र आतापर्यंत इरफानला त्याच्या एका चुकीची माफी सुतापानं दिली नव्हती. पण, अखेर तो क्षण आला आणि त्या त्याच्या या चुका विसरल्या. 


सोशल मीडियावर एका सुरेख आणि भावनिक पोस्ट लिहित त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. 


त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द वाचणाऱ्याच्या काळजाला हात घालत होता. निमित्त होतं ते म्हणजे सुतापा यांचा वाढदिवस. 


'एकत्र व्यतीत केलेल्या 32 पैकी 28 वाढदिवसांना विसरण्यासाठी मी तुला माफ केलंय इरफान. हे सांगण्यासाठीसुद्धा मी तुला परवाच्याच रात्री आठवलं. त्या रात्री इतक्या वर्षांतले वाढदिवस आठवले. 


रागवण्यापासून दु:खी होण्या पर्यंत, शेवटी हतबल होण्यापर्यंत आणि अखेर वाढदिवस साजरा न करण्यामागचं आणि तो विसरण्यामागचं तुझं तत्वज्ञान स्वीकारण्यापर्यंतचं सर्वकाही आठवलं. 


शेवटी मी तुला काल रात्रीच सांगितलं की मला वाढदिवस साजरा केलेला किती आवडतो. मुळात वाढदिवस महत्त्वाचा नसतोच तर, मला फक्त तुझ्यासोबत तो साजरा करणं जास्त महत्त्वाचं वाटतं. 


आश्चर्य म्हणजे काल बाबिल आणि अयान माझा वाझदिवस विसरले नाहीत. मला दाट शक्यता वाटतेय की तुच त्यांच्या स्वप्नात येऊन हे सांगितलं असणार नाहीतर ते का असं करतील. 


इरफान आज मला तुझी सर्वात जास्त आठवण येतेय... इतकी की यापूर्वी कधीच आली नव्हती. तुला वाढदिवसांवर विश्वास नाही. पण, त्यांच्याकडून मला मिळणारं हे प्रेम पाहून तुला नक्कीच फार आनंद झाला असता.... खुप सारं प्रेम इरफान'. 


कुटुंब आणि इरफानसाठी आयुष्य वेचणाऱ्या सुतापांचे हे शब्द आणि त्यातून व्यक्त होणारा प्रत्येक भाव जणू तिला इरफानच्या जवळ असण्याचीच अनुभूती देत होता. 





इथं सुतापा भावूक झालेल्या असतानाच तिथं मुलगा बाबिल यानंही सोशल मीडियावर तिच्यासोबते काही व्हिडीओ शेअर केले. जे पाहून खरंच यांच्या आनंदाला कोणाची दृष्ट न लागो, असंच पाहणारेही म्हणाले.