Naach Ga Ghuma Movie Poster : गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची घोषणा केली जात आहे. आता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाच गं घुमा या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने सादर केली जाणार आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुक्ता बर्वेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचे थोडक्यात वर्णन केले आहे. स्त्री ही घराची राणी असली तरी घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच ! ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे! मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी! ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात. तुमच्या आमच्या घरातल्या, घर चालवणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, दुसऱ्याचं घर सांभाळून आपलं घर चालवणाऱ्या नारीशक्तीला त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत... ‘नाच गं घुमा’ !, असे कॅप्शन मुक्ता बर्वेने दिले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)


'नाच गं घुमा' या चित्रपटाच्या पोस्टरवर मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव दिसत आहे. यात नम्रता संभेराव परीच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या एका हातात तवा आणि दुसऱ्या हातात झाडू दिसत आहे. तर मुक्ता बर्वे ही महाराणीच्या रुपात दिसत आहे. यावेळी तिच्या हातात लॅपटॉप आणि आजूबाजूला फाईल्स दिसत आहे. यावरुन हा चित्रपट मालकीण-मोलकरणी यावर आधारित आहे.


स्वप्नील जोशीचे निर्माता म्हणून पदार्पण


दरम्यान ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी हा निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. ‘नाच गं घुमा’ची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. हा बहुचर्चित चित्रपट 1 मे 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.