`...याच्यासाठीच निवडून दिलं होतं`; नव्या संसदेचा फोटो ट्वीट करत स्वरा भास्करने साधला निशाणा
New Parliament Building : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं आहे. विरोधी पक्षांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. देशातील 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता
New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनाची (New Parliament) खासियतही सांगितली. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या त्या प्रश्नालाही पंतप्रधानांनी प्रत्युत्तरेही दिली. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांचा मागणी होती. याच मुद्द्यावरून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. हवन-पूजेनंतर पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवन देशाला समर्पित केले आहे. दुसरीकडे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले आहे. यावरुनच अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नवीन संसद भवनासमोर कुस्तीपटूंच्या महिला सन्मान महापंचायतीपूर्वी पोलिसांनी जंतरमंतरवर मोठी कारवाई करत सर्व कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनाही ताब्यात घेतले. कुस्तीपटू साक्षी मलिकने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सांगितले की, आम्ही शांततेने मोर्चा काढत होतो पण त्यांनी आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेतले. भारतीय कुस्ती संघाचे प्रमुख बृजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटू महिन्यापासून अधिक काळापासून दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत. मात्र दिल्ली पोलिसांनी या कुस्तीपटूंविरोधात कारवाई केली आहे.
यावरुनच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या स्वरा भास्करने यावरुन संताप व्यक्त केला आहे. स्वरा भास्करने दोन फोटो ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. एका फोटोमध्ये पंतप्रधान मोदी नव्या संसदेत काही साधूंसोबत उभे आहेत. तर दुसऱ्या फोटोत कुस्तीपटू विनेश फोगट ही रस्त्यावर कोसळेली दाखवली आहे. यासोबतच "हे बघा, याचसाठी आपण मतदानातून यांना निवडून दिलं होतं…,"असं कॅप्शन स्वराने दिले आहे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून याचा निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी धरणे आंदोलनादरम्यान झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिल्ली पोलीस कुस्तीपटूंना ताब्यात घेताना दिसत होते. "राज्याभिषेक पूर्ण झाला - 'अहंकारी राजा' रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे!" असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहेत. साक्षी मलिकचा पती सत्यव्रत कादियन याने ताब्यात घेण्यापूर्वी माध्यमांना सांगितले होते की, पत्नीला दुखापत झाली आहे. साक्षी मलिकला वाचवण्यासाठी सत्यव्रतलाच पोलिसांनी मारहाण केली. साक्षी मलिकने ट्विट करून सांगितले की, 'काही चॅनल अशी अफवा पसरवत आहेत की मी एका पोलिसाला मारले, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. दुसरीकडे जंतर मंतरवर उभारण्यात आलेले तंबू उखडून फेकून देण्यात आले आहेत.