मुलांच्या मस्तीमुळे अनेकदा आईवडिलांची अळीमिळी गुपचिळी
अतुल परचुरेंसोबत स्नेहलता वसईकर सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा
मुंबई : झी मराठी प्रेक्षकांसाठी एक असा चॅट शो सादर करणार आहे ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतील. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘अळीमिळी गुपचिळी’. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो 'अळीमिळी गुपचिळी' १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि अतुल परचुरे यांच्या सोबतच या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर. या निमित्ताने त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद
१. अळीमिळी गुपचिळी या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल?
- अळीमिळी गुपचिळी हा एक फॅमिली चॅट शो आहे असं मी म्हणेन, ज्यामध्ये कुटुंबातील लहान मुलांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी, गमतीजमती हे सगळं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. लहान मुलांच्या धमाल मस्तीमुळे कशी अनेकदा आईवडिलांना अळीमिळी गुपचिळी करावी लागते हे प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळेल.
२. तुमच्या सोबत या कार्यक्रमात अतुल परचुरे आणि अर्णव काळकुंद्री देखील असणार आहे, त्यांच्यासोबत तुमचा रॅपो कसा आहे?
या दोघांसोबत माझ्या रॅपो पाहिल्या दिवसापासूनच खूप चांगला आहे. अतुल दादा हा खूप अनुभवी कलाकार आहे त्यामुळे तो ट्रिकी सिच्युएशनसुद्धा एकदम सहज रित्या सांभाळतो. अर्थात तो लहान मुलांचा तो लाडका मोहन दादा आहे त्यामुळे तो कोणाशीही पटकन जुळवून घेतो. मला एक मुलगी आहे आणि अर्णव अगदी तिच्या सारखाच आहे त्यामुळे त्याचे मी सतत लाड करते आणि आमची खूप छान गट्टी जमली आहे.
३. तुम्हाला कधी तुमच्या मुलीने कोपरखळी दिली आहे का?
शौर्याने मला अनेकदा कोपरखळी दिली आहे, किंबहुना ती रोजच देते. तिचा स्वभाव मुळातच खूप मिश्किल आहे. शौर्याने पहिली कोपरखळी तिच्या जन्माच्या पहिल्याच दिवशी दिली होती. जेव्हा तिचे वडील तिला हातात घ्यायला गेले तेव्हा तिने तिच्या वडिलांना डोळा मारला होता. हि होती शौर्याची पहिली कोपरखळी.
४. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात घडलेला एखादा मजेशीर किस्सा शेअर कराल.
चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी खूप मजेशीर किस्से घडले. आम्ही खूप लहान मुलांसोबत शूटिंग केलं. त्यातील अनेक मुलं बोलकी होती, काही शांत होती, काही चंचल होती. मुलांसोबत त्यांच्या कलेने घेऊन चित्रीकरण करणं हे सोपं नव्हतं, आमची खूप भंभेरी उडाली पण त्यातही एक मजा होती आणि ती मजा आता प्रेक्षकदेखील या कार्यक्रमातून अनुभवातील.