Gurucharan Singh Sodhi Missing Health Condition : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंग दिल्लीतून बेपत्ता झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून  गुरुचरण सिंग हा बेपत्ता असून त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता त्याच्या जवळची मैत्रीण सोनीने गुरुचरण सिंगच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला आहे. गुरुचरण हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरु होते, असे तिने म्हटले आहे. 


दिल्लीत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरचरण सिंगची मैत्रीण सोनी हिने नुकतंच 'पिंकवला' या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने गुरचिरण सिंगबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी ती म्हणाली, गुरचरण हा 22 एप्रिलला दिल्लीतून मुंबईला येण्यासाठी रवाना झाला. त्याआधी त्याची तब्ब्येत ठिक नव्हती. डॉक्टरांकडून त्याने काही चाचण्याही केल्या होत्या. सध्या त्याचे पालक चिंतेत आहेत. त्यांनी तो हरवल्याची तक्रार दिल्लीत दाखल केली आहे. 


जास्त खात-पित नव्हता


मी मुंबईतही त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. गुरुचरणची प्रकृती ठिक नसल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत. दिल्लीतून रवाना होण्यापूर्वी त्याचे ब्लड प्रेशर जास्त झाले होते. त्यामुळे त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने काही चाचण्याही केल्या होत्या. तो जास्त खात-पितही नव्हता. त्यामुळे मी प्रार्थना करते की तो सुखरुप असेल. तसेच तो निरोगी असावा, असेही त्याच्या मैत्रिणीने सांगितले. 


2 दिवसांपासून त्याचा फोनही बंद


'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग हा बेपत्ता आहे. तारक मेहता मालिकेत गुरुचरण सोढी ही पंजाबी भूमिका साकारत होता. गेल्या 4 दिवसांपासून गुरूचरणचा काहीच पत्ता नसल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. गुरूचरण दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाला होता. मात्र तो मुंबईत पोहचलाच नाही. गेल्या 2 दिवसांपासून त्याचा फोनही बंद असल्याचं समोर आलं आहे. 


दरम्यान गुरुचरण सिंगने काही वर्षांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सोडली. यात तो रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत झळकत होता. त्याच्या वडिलांच्या प्रकृतीचे कारणं देत त्याने हा टीव्ही शो सोडला होता. मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचं आहे, असं त्याने कार्यक्रम सोडताना म्हटले होते. हा शो सोडणाऱ्या इतर कलाकारांप्रमाणे त्याचंही मानधन निर्मात्यांनी थकवलं होतं.