`नाम फाऊंडेशन`वर तनुश्रीचे धक्कादायक आरोप
`नाम फाऊंडेशन`वर तनुश्रीचे धक्कादायक आरोप
मुंबई : गेल्या वर्षी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. काही दिवसांपूर्वी कोणत्याही पुराव्याअभावी नाना पाटेकर यांना निर्दोष ठरवण्यात आलं. याप्रकरणाला मिळालेल्या वळणामुळे संतप्त तनुश्रीने पोलिसांना भ्रष्ट म्हणत त्यांच्यावरही निशाणा साधला. तनुश्रीने पुन्हा एकदा नानांवर आरोप लावत त्यांची धर्मदाय संस्था 'नाम फाऊंडेशन'बाबतही काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
तनुश्रीने एका मुलाखतीत हे खुलासे केले आहेत. 'नाना पाटेकर यांच्याबाबतचं सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. अगदी सुरुवातीपासूनच याचा प्रारंभ होईल. 'हॉर्न ओके प्लिज'च्या सेटवर कशाप्रकारे त्यांनी स्वत:च्या बाजूने साक्ष वळवली. त्यांनी स्वत:ला कितीही निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, कायदा विकत घेण्याचा प्रयत्न केला किंवा माध्यमांमध्येही स्वत:ची प्रतिमा चांगली राहावी यासाठी सतत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तरीही एक दिवस हे सत्य सर्वांसमोर येणार आहे.
'परंतु त्या शेतकऱ्यांचं काय जे रोज दुष्काळ आणि वाढत्या कर्जाने मृत्यूमुखी पडत आहेत. नाम फाऊंडेशनद्वारा शेतकऱ्यांसाठी जमा केलेले पैसे त्यांना न मिळाल्याचाही' धक्कादायक खुलासा तनुश्रीने केला.
'नाना त्यांच्या सर्वसामान्य जीवनशैलीचा दिखावा करतात. शेतकऱ्यांच्या नावावर करोडो रुपयांचा त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्या पैशांचं काय झालं?असा सवलाही तिने केला आहे. महाराष्ट्रात आजही आधीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. #MeToo प्रकरणी पोलिसांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत याचा अर्थ असा नाही की ते दोषी नाहीत. कोणतीही क्लिन चीट त्यांना या सर्वांपासून वाचवू शकणार नाही', असं म्हणत तिने पुन्हा एकदा नानांवर निशाणा साधला आहे.