मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या वादात आता बऱ्याच बी- टाऊन सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हिंदी कलाविश्वातील काही मोठ्या चेहऱ्यांनी या प्रकरणी मौन बाळगणं योग्य समजलं असलं तरीही काहींनी मात्र आपल्या भूमिका ठामपणे मांडल्या आहेत. यामध्ये आता अभिनेता अक्षय कुमारच्या नावाचाही समावेश झाला आहे. पण, अक्षयचं म्हणणं मात्र काही वेगळंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाना- तनुश्री वादानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेवल्या एका व्हिडिेओमध्ये खिलाडी कुमार या प्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे. पण, हा व्हिडिओ जुना असल्याचं सांगत तो मॉर्फ करण्यात आल्याचा खुलासा त्याने केला आहे.


चुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याने थेट वांद्रे- कुर्ला संकुल (बीकेसी) येथील सायबर पोलीस स्थानकात त्यासंबंधीची तक्रारही दाखल केली आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खिलाडी कुमारने दाखल केलेल्या तक्रारीत त्याने काही गोष्टी नमूद केल्या आहेत. 


काही दिवसांपूर्वी आपण माध्यमांशी संवाद साधत होतो तेव्हा आपल्याला एका कलाकाराविषयी विचारण्यात आलं होतं. पण, कोणीतरी तो व्हिडिओ एडिट करुन आपलं उत्तर अशा प्रकारे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामाध्यमातून आपण तनुश्रीविरोधात बोलत असल्याचं भासत आहे, असं त्याने या तक्रारीत नमूद केलं. 


दरम्यान, झाल्या प्रकरणी चुकीची मतं इतरांपर्यंत पोहोचल्यास त्याचा आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो यामुळे त्याने सदर प्रकरणात पोलिसांची मदत घेतली आहे. 


संबंधीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शोधण्याचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. 


सदर व्हिडिओ हा डिलीट अथवा ब्लॉक केल्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या व्हिडिओची कॉपी मिळवून पुढील तपास सुरु आहे. येत्या काळात या व्हिडिओ प्रकरणीचा तपास पूर्ण होताच दोषींवर भारतीय दंडसंविधानाच्या माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.