मुंबई : टेलिव्हिजन विश्वात लोकप्रियता मिळवल्यानंतर हिंदी चित्रपट वर्तुळात आपली वेगळी आणि तितकीच अप्रतिम ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant singh rajput यानं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतची ही अकाली एक्झिट अनेकांनाच हादरवून गेली. त्याचं अशा प्रकारे आयुष्याच्या शर्यतीत पराभूत होणं कित्येकांनी अद्यापही स्वीकारलेलं नाही. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या खासगी आयुष्याकडे आणि पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्याकडेही अनेकांचं लक्ष वेधलं. 


सुशांत आणि अंकिताच्या नात्याची अनेकांनाच माहिती होती. काही कारणास्तव त्यांच्या या नात्यात दुरावा आला खरा. पण, त्याच्या निधनानं अंकिताही पुरती हादरली. टेलिव्हिजन अभिनेत्री आरती सिंह हिनं अंकिताची सुशांतच्या निधनानंकर नेमकी काय अवस्था झाली होती, याबाबतची माहिती दिल्याचं म्हटलं जात आहे. 


'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत आरतीनं याबाबतचा खुलासा केला. 'मी अंकितामुळंच सुशांतला ओळखत होते. तो एक चांगला मुलगा (व्यक्ती) होता आणि इतरांना खूप जास्त प्रोत्साहन देणाऱ्यांपैकी एक होता. मी अंकिताला ती ठिक आहे का, हे विचारण्यासाठी फोन करुन संपर्क साधला होता. सध्याच्या घडीला तिला तिच्यासाठीच वेळ देण्याची गरज आहे आणि मी तिला तो वेळ देऊ इच्छिते', असं आरती म्हणाली. 



 


आपल्या जीवनाच्या टप्प्यावर एके वेळी अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीचं कायमस्वरुपी निघून जाणं हे अर्थातच अंकिताला धक्का देऊन गेलं. त्यामुळं किमान सध्याच्या घडीला ती परिस्थितीचा स्वीकार करत असून, तिच्या परिनंच प्रसंग हाताळत असल्याचं स्पष्ट होत आहे.