`ससुराल सिमर का` फेम बालकलाकाराचा अपघाती मृत्यू
त्याची प्राणज्योत घटनास्थळीच मावळली
मुंबई : छोट्या पडद्यावर अतिशय गाजलेल्या 'ससुराल सिमर का' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला बालकलाकार, शिवालेख सिंह याचं गुरुवारी निधन झालं. तो चौदा वर्षंचा होता. कार आणि ट्रकमध्ये झालेल्या एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. रायपूरच्या सीमेनजीक हा अपघात झाल्याचं कळत आहे.
१८ जुलै रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास धारसिवा येथे हा अपघात झाल्याची माहिती रायपूरचे पोलीस अधिकारी आरिफ शेख यांनी वृत्तसंस्थेला दिली.
शिवालेखची प्राणज्योत घटनास्थळीच मावळली. तर, त्याची आई लेखा आणि वडील शिवेंद्र सिंह हे जखमी असल्याचं कळत आहे. या अपघातात नवीन सिंह नामक आणखी एक व्यक्तीही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
माध्यमांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शिवालेख आणि त्याचे कुटुंबीय बिलासपूर येथून रायपूरच्या दिशेने निघाले असतानाच हा अपघात झाला. ज्यामध्ये लेखा सिंह म्हणजेच शिवालेखच्या आईची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला ज्या ट्रकला शिवालेखच्या कुटुंबीयांची कार आदळली त्या ट्रकचालकाचा शोध सुरु आहे. संबंधित ट्रकचालक वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढण्यात यशस्वी ठरला होता.
मुळचा छत्तीसगढचा असणारा शिवालेख गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत त्याच्या आई-वडिलांसोबत राहत आहेत. 'संकट मोचन हनुमान', 'ससुराल सिमर का', 'श्रीमान श्रीमती फिरसे', 'लाल इश्क', 'अग्निफेरा' अशा मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं. शिवाय काही रिऍलिटी शोच्या माध्यमातूनही तो झळकला होता. 'केसरी नंदन' ही त्याची अखेरची मालिका ठरली आहे.