`तारक मेहता...` फेम दिलीप जोशीचं मोठं स्वप्न साकार
या मालिकेतील जेठालाल या भूमिकेमुळे दिलीप चांगलाच प्रसिद्ध आहे.
मुंबई : एखाद्या क्षेत्रात आपण जेव्हा कारकिर्दीची सुरुवात करतो, तेव्हा अनेक स्वप्न उराशी बाळगलेली असतात. मुळात ही स्वप्नच अनेकदा त्या क्षेत्रात आपल्याला उत्तमोत्तम कामगिरीसाठी प्रेरणा देत असतात. असंच एक स्वप्न बाळगलं होतं, अभिनेता दिलीप जोशी यांनी. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून 'जेठालाल' ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या दिलीपची स्वप्रपूर्तीही झाली आहे. त्यानेच याविषयीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
दिलीप जोशीचं एक मोठं स्वप्न साकार झालं, असं म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांना एका महान अभिनेत्याला भेटण्याची संधी मिळाली आहे. दाक्षिणात्य कलाविश्वावर दबदबा असणाऱ्या आणि जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांनी भेटण्याची संधी दिलीपला मिळाली.
ट्विट करुन त्याने या थेट आणि ग्रेट भेटीचा आनंद व्यक्त केला. 'भगवान के घर, देर है अंधेर नही...' असं लिहित त्याने रजनीकांतसोबतचे फोटो पोस्ट केले. कायमच रजनीकांत यांना व्यक्तीश: भेटण्याची इच्छा होती. चित्रनगरीत अगदी अनपेक्षितपणे त्यांची भेट घडणं हे अविश्वसनीय आहे. ते एक प्रेरणास्त्रोतच आहेत. त्यांची भेट घडून येणं यात मी माझं नशीबच समजतो....', असं म्हणत दिलीपने त्याचा आनंद व्यक्त केला.
कायमच चाहत्यांच्या गर्दीत असणाऱ्या आणि प्रसिद्धीझोतात असणाऱ्या रजनीकांत यांची भेट घेण्याची अनेकांची इच्छा असते. कित्येकदा काही कारणांस्तव ती इच्छा पूर्ण होत नाही. पण, ज्यांची ही इच्छा पूर्ण होते ते भाग्यवंतच. आता याच भाग्यवंतांमध्ये दिलीप जोशीचाही समावेश झाला आहे, असं म्हणायरा हरकत नाही.