नवी दिल्ली : शुटींग संपवून आपल्या घरी परतत असताना गाडीचा अपघात झाला आणि या अपघातात दोन तरुण तेलुगु टीव्ही अभिनेत्रींना आपला जीव गमवावा लागलाय. अनुषा रेड्डी आणि भार्गवी या दोन अभिनेत्रींचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळेच तेलुगु सिनेइंडस्ट्रीसाठी बुधवारचा दिवस अत्यंत दु:खी ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी विकाराबाद इथं घडली. हैदराबादमध्ये आपल्या आगामी प्रोजेक्टचं शुटींग संपवून दोन्ही अभिनेत्री घरी परतत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात या दोघींनी आपला जीव गमावलाय. समोरून येणाऱ्या ट्रकपासून वाचण्यासाठी अभिनेत्रीनं गाडी बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचं गाडीवरून नियंत्रण सुटलं आणि गाडी सरळ समोरच्या एका झाडावर आदळली. 


अभिनेत्री भार्गवी

या गाडीमधून चार अभिनेत्री प्रवास करत होत्या. त्यापैंकी दोघींचा जागीच मृत्यू झाला तर दोघी गंभीररित्या जखमी झाल्या. जखमींवर हैदराबादच्या ओसिमानिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


तेलुगु अभिनेत्री भार्गवी ही केवळ २० वर्षांची होती तर अनुषा २१ वर्षांची... दोघीही तेलुगु सिनेक्षेत्रात आपली ओळख बनवण्याच्या प्रयत्नात होत्या. भार्गवी टीव्ही कार्यक्रम 'मुत्याला मुग्गू'मध्ये नकारार्थी भूमिका निभावत होती तर अनुषाही काही प्रोजेक्टसवर काम करत होती. अनुषा रेड्डी ही तेलंगणाच्या जयशंकर भुपालापल्लीची आहे.