मी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची आई किंवा आहारतज्ज्ञ नाही- सानिया मिर्झा
पाकिस्तानी अभिनेत्री आणि ट्रोल करणाऱ्यांना सानियाचं सडेतोड उत्तर
मुंबई : भारतीय संघाकडून विश्वचषकाच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघावर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यातच पाकिस्तानच्या संघातील ऑलराऊंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब मलिक याच्या पत्नीवर म्हणजेच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यावरही जोरदार टीका झाली. सानियाने टीकाकारांना उत्तर दिलं खरं. पण, आता मात्र तिचा वाद रंगलाय तो म्हणजे अभिनेत्री वीणा मलिक हिच्यासोबत.
एका चाहत्याने शेअर केलेल्या (आताच्या घडीला डिलीट करण्यात आलेल्या) व्हिडिओविषयी कमेंट करत त्या माध्यमातून तिने सानियाच्या पालकत्वावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. 'मला खरंतर तुझ्या बाळाची चिंता वाटत आहे. तुम्ही त्याला शीषा पॅलेसमध्ये नेणं हे धोकादायक नाही का?', असं तिने या ट्विटमध्ये लिहिलं.
सानियाने ट्रोलर्सना जे उत्तर दिलं होतं, त्याच ट्विटला 'रिप्लाय' देत वीणा मुक्ताफळं उधळत होती. तिच्या या ट्विटकडे लक्ष जाताच सानियाने तिला थेट शब्दांत सुनावलं.
'वीणा मी माझ्या मुलाला शीशा पॅलेसमध्ये नेलं नव्हतं. आणि मुळात याविषयी तू किंवा इतर कोणीही बोलण्याचा मुद्दाच नाही. कारण, तुमच्याहून त्याची मला जास्त काळजी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची आहारज्ज्ञ, त्यांची आई, मुख्याध्यापिका किंवा शिक्षिका नाही की जे कधी झोपतात, कधी उठतात कधी खातात याविषयी मला माहिती असावी. पण, तरीही तू व्यक्त केलेल्या काळजीसाठी धन्यवाद', असं ट्विट करत सानियाने थेट शब्दांत वीणाला या साऱ्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
असं काय होतं त्या व्हिडिओमध्ये?
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत. ज्यामध्ये पाकिस्तानच्या इतरही खेळाडूंचा सहभाग आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांदरम्यानचा सामना पार पडण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच खेळाडू त्या ठिकाणी पाहिले गेले होते, ज्यामुळे पाकिस्तानी क्रीडारसिकांनी नाराजीचा सूर आळवला होता. पण, शोएबने मात्र हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगत हे सर्व आरोप फेटाळले होते.