नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेते अनूपम खेर यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'सिनेमाचा वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. आता यामध्ये नवे प्रकरण समोर आले आहे. या सिनेमाप्रकरणी मुजफ्फरपूर सीजेएम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारदार सुधीर ओझा यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तक्रारदाराने सिनेमातील अभिनेते अनूपम खेर यांच्याव्यतिरिक्त सिनेमा निर्माता आणि निर्देशक यांच्या सहित 14 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्या माध्यमातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत राहुल गांधी, सुष्मा स्वराज, अटल बिहारी वाजपेयी, लालू प्रसाद यादव आणि मायावती अपमानित केले गेल्याचे ओझा यांचे म्हणणे आहे. सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर स्टारकास्टच्या लूकचं कौतूक करण्यात येतं होतं. पण आता नवेच वाद उफाळलेले पाहायला मिळत आहेत. या सिनेमाच्या संहितेवर महाराष्ट्र यूथ कॉंग्रेसने देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमातील स्टारकास्टला सुरक्षा पुरवण्याची मागणी अलीगढ भाजपच्या यूनीटने केली आहे. 


 या सर्व प्रकरणावर अनूपम खेर वेळोवेळी आपली भूमिका मांडत असतात. संजय बारू यांच्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. आम्ही सिनेमा सेंसॉर बोर्डला दाखवला आणि तिथून तो ओके होऊन आला आहे. त्यामुळे सिनेमा आता इतर कोणाला दाखवण्याची गरज नाही, असे खेर यांनी म्हटले. 


 मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ सलग दहा वर्षे पंतप्रधान पदावर कार्यरत होते. युपीए १ आणि युपीए २ या दोन्ही सरकारांचे नेतृत्त्व त्यांनी केले होते. त्याचा हा दहा वर्षांचा कार्यकाळ सरकारवरील विविध आरोपांमुळे गाजला होता. त्या पार्श्वभूमीवर याच कार्यकाळावर आधारित सिनेमा येत असल्यामुळे सिनेरसिकांमध्ये त्याची बरीच चर्चा आहे. 'द अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' सिनेमामध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका अभिनेते अनुपम खेर यांनी साकारली आहे. ट्रेलरमधून अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची प्रतिमा हुबेहूब साकारली असल्याचे बघायला मिळते. संजय बारू यांनी 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हे पुस्तक लिहिलेले आहे. याच पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे.