`बँकेने मुंबईतलं घर सील केलं आणि ते घर...` आदिनाथ कोठारेने भावूक होत सांगितला आयुष्यातील वाईट टप्पा
आदिनाथने त्याच्या पर्सनल आयुष्याशी संबधित एक असा किस्सा सांगितला ज्यामुळे त्याचे चाहतेही भावूक होताना दिसत आहेत.
मुंबई : अभिनेता आदिनाथ कोठारे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर आदिनाथचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर आदिनाथ खूप सक्रियदेखील असतो. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आदिनाथ सोशल मीडियावर त्याचे अपडेट्स् देत असतो. आदिनाथने एखादी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती अवघ्या काही वेळातच व्हायरल होते. नेहमी चर्चेत असणारा आदिनाथ पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. कायमच आदिनाथ त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. यावेळी आदिनाथने त्याच्या पर्सनल आयुष्याशी संबधित एक असा किस्सा सांगितला ज्यामुळे त्याचे चाहतेही भावूक होताना दिसत आहेत.
नुकतीच आदिनाथने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ म्हणाला, ''मी आज तुम्हाला एक किस्सा सांगतो खरंतर, आताच त्यांचं (महेश कोठारे) एक पुस्तक आलंय 'डॅम इट आणि बरंच काही' त्यामध्ये सुद्धा त्यांनी याबद्दल लिहिलं आहे. माझं तेव्हा नुकतंच TY (पदवीचं तृतीय वर्ष ) पूर्ण झालं होतं आणि मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं. त्यावेळी घरात परिस्थिती खूप वाईट होती. कारण, माझ्या वडिलांचे तेव्हा दोन सिनेमे चालले नव्हते.
आदिनाथ पुढे म्हणाला, ''त्यावेळी कोल्हापूरला 'खबरदार' चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. मी तेव्हा जेमतेम २०-२१ वर्षांचा असेन आणि त्यावेळी 'खबरदार' चित्रपटासाठी मी वडिलांकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. त्यावेळी आमच्यावर खूप मोठं कर्ज होतं. घरी सगळा गोंधळ चालू होता. पण, त्यावेळी आम्ही दोघंही पूर्णपणे आणि अगदी मनापासून 'खबरदार' चित्रपटासाठी काम करत होतो आणि असंच एकदा शूटिंग चालू असताना बँकेने आमचं मुंबईतलं घर सील केलं आणि ते घर जप्त केल्यामुळे आमच्याकडे मुंबईत घरच नव्हतं. ''मला आणि माझ्या आजी-आजोबांना याबद्दल काहीच सांगितलं नाही. तरीही या सगळ्यात त्यांनी शूटिंगचं सगळं शेड्यूल संपवलं.
आदिनाथ पुढे म्हणाला, ''माझ्या वडिलांनी आणि आईने कोणाला काहीच कळू दिलं नाही. शूटिंग संपल्यावर मी आणि आजी-आजोबा पुण्यात येऊन राहिलो. तर, दुसरीकडे माझे आई-वडील मुंबईत येऊन घर शोधत होते. त्यानंतर २००५ मध्ये आम्ही कांदिवलीला शिफ्ट झालो. त्या परिस्थितीत माझ्या वडिलांनी मला पुढचं शिक्षण मिळावं यासाठी कर्ज घेतलं. त्यांचं एकच म्हणणं होतं की, याचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. तर, माझ्या आयुष्यात खरे 'शक्तिमान' माझे आई-वडील दोघंही आहेत.'' असं आदिनाथ कोठारेने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं