मुंबई : मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे गुरूवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकऱ्या देणारा होऊ शकतो आणि ह्या महाराष्ट्रात केवळ आणि केवळ मराठी माणसाचाच डंका वाजला पाहीजे, असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी मला आशा आहे. मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ निर्माता प्रकाश बाविस्कर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या सोबत आहे, अशी ग्वाही श्री. सुरेश हावरे यांनी ह्या प्रसंगी दिली.


मराठी पाऊल पडते पुढे या शीर्षकातच मराठी माणूस सुध्दा प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे, हे स्पष्ट होते. निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. त्यावेळी मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो,  हे प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करुन येन केन प्रकारे उभरत्या व्यवसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे.


 ''आयुष्यात सहजासहजी काहीच मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. मी जेव्हा 1993 बॉम्बस्फोट खटल्यानिमित्त मुंबईत आलो. तेव्हा बॉम्बस्फोट खटला हा एक संघटीत गुन्हेगारीची केस होती त्यामुळे ह्या एवढ्या मोठ्या शहरात आपला निभाव लागेल का? अशी माझ्या मनात भिती होती. पण, जिद्द आणि संघर्षाचं व्रत घेतलं आणि यशस्वी झालो. मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली. आयुष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. संगीतही श्रवणीय आहे. शीर्षकगीत मनाला प्रेरणा देणारे आहे. 


आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली होऊ शकत नाही. पण, संघर्ष करण्याची प्रेरणा देतो आणि हीच प्रेरणा मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटातून मिळेल, असा मला विश्वास आहे. निर्माते प्रकाश बावीस्कर हे माझ्या जिल्ह्यातील आहेतच पण माझे चांगले मित्रही आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.'' असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यानिमित्त काढले.