मुंबई : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत,  राजवारसा प्रॉडक्शन्स आणि मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'सापळा' हा आगामी मराठी चित्रपट  १९ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्याचे पोस्टर गुरुवारी २१ डिसेंबर रोजी एका दिमाखदार समारंभात प्रदर्शित करण्यात आले.  या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, दीप्ती केतकर, नेहा जोशी यांच्या भूमिका आहेत.  निखिल लांजेकर दिग्दर्शित 'सापळा'ची कथा  श्रीनिवास भणगे यांची असून पटकथा आणि संवाद  दिग्पाल लांजेकर यांचे आहेत.  चित्रपटाची निर्मिती प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर यांची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना दिग्दर्शक निखिल लांजेकर म्हणाले, "मला गूढकथा नेहमीच आवडत आल्या आहेत. अशाप्रकारच्या कथा या प्रेक्षकांना  नेहमीच अत्यंत प्रभावीपणे भुरळ घालतात. एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून उत्तम कथेच्या शोधात असताना प्रख्यात कथालेखक श्री श्रीनिवास भणगे यांची एक अत्यंत प्रभावी आणि जुनी नाट्यसंहिता वाचनात आली. आपल्या मराठी साहित्याची भव्य कक्षा  ही आश्चर्यचकित करणारी आहे. ही कथा आजच्या तंत्रज्ञानाची जोड देत मोठ्या पडद्यावर आणण्याचा मोह मी आवरू शकलो नाही."



"श्री दिगपाल लांजेकर यांच्या समर्थ लेखणीच्या आधारे या कालातीत कलाकृतीची पुनर्निर्मिती आम्ही करत आहोत. याची पटकथा आणि संवाद आजच्या प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहिले गेलेले आहेत. कथेमध्ये अत्यंत बारकाईने सुधारणा करून त्यात आधुनिकता आणली गेली  आहे की जेणेकरून ती आजच्या परिस्थितीला साजेशी ठरेल. मला पूर्ण खात्री आहे की, आश्चर्यानी भरलेला हा कथेचा प्रवास प्रेक्षकांना खिळवून तर ठेवेलच पण त्याचबरोबर त्यांना अचंबितसुद्धा करेल. समकालीन आणि कालातीत अशा दोन्हीचा एक आगळा असा मिलाफ यात साधला गेला असून त्यातून एक असा सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना मिळेल की जो आपल्या समृद्ध अशा कथाकथन परंपरेचा एक नमूना असेल."निखिल लांजेकर  म्हणतात.


प्रस्तुतकर्ते श्री संजय छाब्रिया म्हणाले, “एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट ही दर्जेदार निर्मिती आणि चांगल्या कथांसाठी ओळखली जावी यासाठी आम्ही नेहमी आग्रही असतो. ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ हा एक स्वतंत्र निर्मिती स्टुडीओ असून त्यांनी गेल्या एका दशकात २३ चित्रपटांची निर्मिती, प्रस्तुती केली आहे. उच्च निर्मितीमुल्ये आणि दर्जेदार कथा यांमुळे त्यांच्या चित्रपटांना बाजारमुल्य मोठे आहे. अनेक लोकप्रिय चित्रपट त्यांनी दिले आहेत. मुंबई-पुणे-मुंबई, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हॅप्पी जर्नी, तुकाराम,आम्ही दोघी,अनन्या, महाराष्ट्र शाहीर’, हे त्यांतील काही चित्रपट आहेत.