`गली बॉय` फेम `MC Sher`च्या फिटनेस मागचे रहस्य
`गली बॉय` चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी चांगलाच प्रकाशझोतात आला आहे.
मुंबई : 'गली बॉय' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. त्याच्या 'शेर'या भूमिकेला सुद्धा चाहत्यांनी प्रचंड दाद दिली. एवढेच नाही तर त्याच्या फिटनेसबद्दलही अनेक चर्चा रंगू लागल्या. आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी तो जिममध्ये जाण्याचे कष्ट कधीच घेत नाही. हॉलिवूड चित्रपट 'मॅन ईन ब्लॅक'च्या हिंदी डबिंगसाठी सिद्धांतने आपला आवाज दिला होता. सिद्धांतने नुकताचं एका फुटविअर कलेक्शनच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. याच दिनाचे औचित्य साधत त्याच्या राहाणी-साहनी बद्दल चर्चा करण्यात आली.
यावेळेस त्याच्यासह भारतीय धावपटू द्युती चंद आणि भारतीय महिला फुडबॉल संघाची कर्णधार अदिती चौहान उपस्थित होते. स्वत:च्या फिटनेस बद्दल त्याला विचारण्यात आल्यानंतर त्याने आपण जिमला जात नसल्याचे सांगितले, तो म्हणाला, 'मी कधीही जिम करत नाही. मी नियमितपणे कॅलिस्थेनिक्स, मार्शल आर्ट्स, आणि पाकरर करतो. हे सगळे प्रकार नैसर्गिक आहेत. त्याचबरोबर मी धावणे, पुश-अप्स काढणे हे व्यायम प्रकार मी करतो'
त्याचप्रमाणे या सर्व व्यायम प्रकारांना जोड म्हणून सिद्धांतला फुटबॉल खेळण्यात सुद्धा रस आहे. लहानपणापासून त्याला फुटबॉल हा खेळ फार आवडतो. सिद्धांत लवकरच 'इनसाइड एज'च्या दुसऱ्या भागात झळकणार आहे. या सीजनचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या महिन्याखेरीस सीजनची अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार आहे.