Video : `स्पॉटलाइट बंद करा...`; नेमकं KK सोबत शेवटच्या क्षणांमध्ये असं काय घडलं?
लाईव्ह कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई : प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक के.के याचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. लाईव्ह कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. के.के निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
के.केच्या निधनाने अनेकजण दुखावली गेली आहेत. कोणालाही कल्पना नव्हती की, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये 'हम रहे या ना रहें कल' हे गाणं म्हटल्यानंतर हा गायक खरोखरच हे जग सोडून जाईल.
के.केच्या निधनानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असं काय झालं की, हा लोकप्रिय गायक जगाला अलविदा करून निघून गेला.
कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केकेला नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्याच्या गुरुदास कॉलेजच्या फेस्टमध्ये परफॉर्म करत असताना गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ के.केची तब्येत अचानक बिघडली. प्रेक्षकांसमोर गाणं सादर करताना गायक त्याच्या सहकाऱ्यांना त्याच्या तब्येतबद्दल वारंवार सांगत होता. जेव्हा त्याला जास्त त्रास झाला तेव्हा त्याने निर्मात्यांना स्पॉटलाइट बंद करण्यास सांगितलं. याचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जवळपास रात्री 8:30 च्या सुमारास, के.के लाइव्ह कॉन्सर्ट संपवून हॉटेलवर परतला. मात्र, हॉटेलमध्ये पोहोचताच तो अचानक खाली कोसळला. त्यानंतर 10:30 च्या सुमारास त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (CMRI) नेण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आलं.
के.के हा बॉलिवूडचा टॉप-क्लास गायक होता ज्याने अनेक भाषांमध्ये गाणी गायली. ज्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच सर्वांच्या हृदयावर राज्य केलं होतं. 90 च्या दशकात केकेने मैत्री आणि प्रेमावर आधारित अनेक गाणी गायली होती आणि ती गाजलीही होती. मात्र आता त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.