मुंबई : आयुष्यात अनेकदा अशी काही वळणं येतात जेव्हा परिस्थिती काहीशी बिघडते, गोष्टी अटोक्यात राहात नाहीत. अशा वेळी कोणा एका व्यक्तीचा आधार आणि त्याची किंवा तिची साथही फार महत्त्वाची ठरते. अशीच साथ मिळाली होती, अभिनेत्री करीना कपूर हिला. अभिनय विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करत कलाविश्वातील प्रतिष्ठीत कुटुंबाला साजेशी कामगिरी करत करीनाने या क्षेत्रात घट्ट पाय रोवले. पाहता पाहता ती यशाच्या शिखरावरही पोहोचली. आजच्या घडीला ती बी- टाऊनची बेगम म्हणूनही ओळखली जाते. पण, यशाच्या या टप्प्यावर पोहोचण्यासाठी तिला काही अडचणींचा आणि कठीण प्रसंगांचा सामनाही करावा लागला होता. या साऱ्यामध्ये तिला खंबीरपणे साथ देत उभा होता, अभिनेता आणि तिचा पती सैफ अली खान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'शी संवाद साधताना करिनाने तिच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्याविषयी माहिती दिली. करिष्मा कपूरच्या अभिनय कारकिर्दीनंतर करीनाही तिच्यापासून प्रेरित झाली आणि तिनेही आपला मोर्चा अभिनय विश्वाकडे वळवला. सुरुवातीचा काळ अगदी चांगल्या रितीने पार पडला. पण, पुढे जाऊन जवळपास एक वर्षभरासाठी तिने काम केलं नव्हतं. आपली कारकिर्द इथेच संपल्याच्या भावनेने करीनाच्या मनात घर केलं. स्वत:चा पुन्हा नव्याने शोध घेण्याचा सल्लाही तिला देण्यात आला होता. खुद्द करीनानेच याविषयीची माहिती दिली. 


'सर्वांच्याच वाटेत काही कठीण प्रसंग येतात. पण, एक अभिनेत्री म्हणून हे सारं जास्त अवघड होतं. कारण तुमच्यावर असंख्य नजरा खिळलेल्या असतात. नशिबाने मला आधार देणारी लोकंही भेटली. ज्यावेळी या साऱ्यामुळे माझा तोल ढासळतोय असं वाटलं तेव्हा मला सैफने सावरलं, आधार दिला', असं करीना म्हणते. 


सैफला ती अनेकदा भेटली होती. पण, 'टशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला भेटलेला सैफ हा वेगळा होता. पाहता पाहता ती त्याच्या प्रेमात पडली. लडाख आणि जैसलमेर येथे चित्रीकरणातून वेळ काढत ते दोघंही अनेकदा लाँग बाईक राईडवरही जात. हळूहळू त्यांचं हे नातं अधिकच दृढ होत गेलं. १० वर्षांहून मोठा, त्यातही दोन मुलं असणारा सैफ हा त्यावेळी करीनाला आधार देण्यासोबतच तिला स्वत:वर प्रेम करायला शिकवून गेला. त्याच्यामुळे तिने गोष्टींमध्ये समतोल राखण्याची कलाही शिकली. 



काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आपण काही २५ वर्षांचे नाही आणि दररोज असं आपल्याला सोडण्यासाठी घरापर्यंत येऊ शकत नाही याची जाणिव सैफने तिला करुन दिली. त्यामुळे त्यानेच करीनाच्या आईकडे तिच्यासोबतचं उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठीची परवानगी मागितली. पुढे जाऊन सैफ आणि करीना विवाहबंधनात अडकले. 


बी- टाऊनच्या या जोडीच्या आयुष्यात तैमूर या त्यांच्या मुलाचंही आगमन झालं. त्याच्या येण्य़ाने आपलं आयुष्यच बदलून गेल्याचं सांगच करिअर आणि कुटुंब या दोन गोष्टींपैकी कोणा एका गोष्टीची निवड करण्याची मला कधी गरजच लागली नाही, हे करीना आवर्जून सांगते. कारण, अनेक चढ-उताराच्या या वाटेत ती एक अभिनेत्री असण्यासोबतच बहीण, पत्नी, आई अशा भूमिकाही तितक्याच शिताफीने हाताळत असल्याचं सांगते.