मुंबई : प्रियांका चोप्रा- निक जोनास, रणवीर सिंग- दीपिका पदुकोण, यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच अभिनेत्री प्रिया बापटच्या एका पोस्टने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. प्रियाने, 'एक गुड न्यूज आहे', असं कॅप्शन देत उमेशसोबतचा फोटो पोस्ट केला. ज्यानंतर ती गरोदर असल्याचं समजत अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियाने पोस्ट केलेला फोटो आणि एकंदर तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या आनंदामुळेच ही गल्लत झाली. चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळाली. पण, अखेर आता या प्रकरणावरुन पडदा उचलला गेला आहे. 


प्रियाच्या गरोदरपणाच्या चर्चांदरम्यानच, दादरच्या प्रभादेवी परिसरातही "दादा, मी प्रेग्नन्ट आहे'' असे होर्डिंगही लावण्यात आले होते. ज्यामुळे अनेकांनी या बाबत तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. ज्यानंतर अखेर याचा उलगडा झाला. 


नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स घेऊन येत आहे एक नवंकोरं नाटक 'दादा,एक गुड न्युज आहे', नुकतंच ह्या नाटकाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'तर ही आहे गुड न्यूज! आमची पहिली निर्मिती', असं लिहित प्रियाने ही पोस्ट शेअर केली. 


बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे. उमेश ह्या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. 



ऋताचं हे रंगभूमीवरील पहिलंच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकरने असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.