मुंबई : अनेक आव्हानात्मक भूमिकांना पेलत अभिनेत्री कंगना रानौत हिने नेहमीच तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटानेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या चित्रपटात झाशीच्या राणीच्या भूमिकेत झळकणाऱ्या कंगनाने प्रचंड मेहनत घेतली होती. घोडेस्वारी म्हणू नका किंवा मग तलवारबाजी, प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण तिने  घेतलं होतं. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहता मात्र नेटकऱ्यांची आणि काही चाहत्यांची मतं बदलली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडिओमध्ये कंगनाचा घोडेस्वारीचा जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात ती चक्क वीजेवर चालणाऱ्या एका घोड्यावर स्वार झालेली दिसत आहे. मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या अपेक्षा काय होत्या, आणि त्यांना या व्हिडिओतून जे पाहायला मिळत आहे त्यामुळे कंगनाची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दृश्य आणखी वास्तवादी दाखवण्यासाठी कोणकोणत्या कल्पना आखल्या जातात याचाही प्रत्यय येत आहे. 



'मणिकर्णिका...' पाहताना मात्र कंगनाने खरंच घोडेस्वारी केल्याचं पाहायला मिळत असून त्यातील काही दृश्य याला अपवाद आहेत हे आता व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर समोर आलं आहे. क्वीन कंगनाने या चित्रपटाच्या निमत्ताने दिग्दर्शनाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली होती. सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत बऱ्याच वादांच्या भोवऱ्यातून वाट काढत तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने तिच्या कारकिर्दीत आणखी एक टप्पा यशस्वीपणे सर करत या कलाविश्वात आपलं स्थान आणखी भक्कम केलं आहे असंच म्हणावं लागेल.