हा असणार श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. ५४ व्या वर्षी श्रीदेवींनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्रीपर्यंत त्यांचं पार्थिव मुंबईला आणण्यात येणार आहे.
१९९७ साली आलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी १५ वर्ष ब्रेक घेतला. २०१२ साली इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून त्यांनी कमबॅक केलं आणि पुन्हा स्वत:ला सुपरस्टार म्हणून सिद्ध केलं. २०१७ साली आलेला मॉम हा चित्रपटही यशस्वी ठरला. मॉम हा श्रीदेवींचा ३००वा चित्रपट होता.
यानंतर आता झिरो या चित्रपटामध्ये श्रीदेवी दिसणार असल्याची माहिती आहे. आनंद एल.राय यांच्या झिरो या चित्रपटामध्ये शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.
झिरो या चित्रपटामध्ये श्रीदेवी यांचा छोटा रोल असणार आहे. झिरो चित्रपटात एका पार्टीमध्ये श्रीदेवी शाहरुख खान, आलिया भट आणि करिश्मा कपूरसोबत दिसणार आहेत, असं बोललं जातंय
१९६७मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण
१९६३ साली जन्म झालेल्या श्रीदेवींनी १९६७मध्ये बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. श्रीदेवींनी हिंदीबरोबरच तेलगू, तामीळ, कन्नड आणि मल्ल्याळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. २०१२ साली त्यांनी इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून कमबॅक केलं. २०१३ साली त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
तामीळनाडूमध्ये झाला जन्म
श्रीदेवींचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली तामीळनाडूच्या शिवकाशीमध्ये झाला होता. चार वर्षांची असतानाच त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. कंधन करुणई हा त्यांचा पहिला चित्रपट होता. बाल कलाकार म्हणून श्रीदेवींनी तेलगू आणि मल्ल्याळम चित्रपटातही काम केलं होतं.
१९७८ साली बॉलीवूडमध्ये
दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये नाव कमावल्यावर श्रीदेवी १९७८मध्ये मुख्य कलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये दिसल्या. सोलहवा सावन हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. ८० च्या दशकामध्ये श्रीदेवी यशाच्या शिखरावर पोहोचल्या. या प्रसिद्धीमुळे श्रीदेवींना फिमेल सुपरस्टार म्हणूनही ओळख मिळाली.