आमिरच्या `ठग्स ऑफ हिंदुस्तान`ला जोरदार झटका
निषाद समाजानं दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या नावानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय
जौनपूर : दीर्घप्रतिक्षित 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा यंदाच्या वर्षातला बिग बजेट सिनेमा ठरतोय. परंतु, या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी अवघ्या काही दिवस अगोदर सिनेमाला जोरदार झटका बसलाय. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमाचा प्रोड्युसर, डायरेक्टर आणि अभिनेता अमिर खानवर विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा आणि मानहानीचा आरोप करण्यात आलाय. 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हे शीर्षक बदलण्याची तसंच मल्लाह जातीच्या अगोदर 'फिरंगी' शब्द हटवण्याचा उल्लेख करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आलीय.
मल्लाह आणि निषाद समाजाचा आक्षेप
'मल्लाह'पूर्वी 'फिरंगी' शब्द हटवण्यासाठी निषाद समाजानं दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या नावानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. त्यानंतर अधिवक्ता हंसराज चौधरी यांनी 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'चा प्रोड्युसर आदित्य चोपडा, दिग्दर्शक विजय कृष्णा आणि अभिनेता आमिर कान यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलीय.
'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या ट्रेलरमध्ये आपल्या जातीला 'फिरंगी' शब्दानं संबोधित केल्याचं पाहिल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. सिनेमाला हीट करण्यासाठी आपण एखाद्या जातीला अपमानित करतोय, याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आल्याचं तक्रारदारांचे वकील हिमांशु श्रीवास्तव आणि ब्रजेश सिंह यांनी म्हटलंय.