पाण्यासाठीचा संघर्ष..., मराठवाड्याचं चित्र रेखाटणाऱ्या `पाणी`चा ट्रेलर रिलीज
मराठवाड्यातील पाणीटंचाईसाठी संघर्ष करणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा. प्रियांका चोप्रा जोनस, राजश्री एंटरटेनमेंट यांच्या `पाणी` चित्रपटाचा ट्रेलर रिलीज.
Paani Movie Trailer : राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत 'पाणी' हा चित्रपट महाराष्ट्रातील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट आहे. 18 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.
मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
पाणी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय?
'पाणी' चित्रपटात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात हनुमंत केंद्रे यांचे इतिहास घडवणारे कार्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाणी प्रश्नांमुळे गावातील अनेक कुटुंबे गाव सोडून जात असतानाच या तरुणाने गावातच राहून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. गावात पाणी नसल्याने त्याचे लग्नही होत नसल्याचे ट्रेलरमध्ये दिसतेय. त्यामुळे आता गावात पाणी आणण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तरुणाचा हा प्रवास कसा असणार, गावात पाणी येणार का? ज्या तरुणीवर त्याचे प्रेम आहे तिच्याशीच लग्न होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 18 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत.
चित्रपटात आदिनाथ कोठारेने साकारली 'जलदूता'ची भूमिका
या 'जलदूता'ची म्हणजेच हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे याने साकारली असून या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शनही आदिनाथ कोठारे यानेच केले आहे. तर नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते असून महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.
प्रियांका चोप्रा काय म्हणाली?
प्रियांका चोप्रा म्हणाली की, हा एक असा सामाजिक विषय आहे. तो जगभरात पोहोचणे अतिशय महत्वाचे आहे. असा विषय घेऊन आम्ही येतोय याचा विशेष आनंद आहे. अनोख्या आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. 'पाणी' हा त्यातीलच एक चित्रपट आहे. खूप चांगल्या पद्धतीने या चित्रपटाची रचना करण्यात आली आहे. या चित्रपटाची टीमही उत्कृष्ट आहे. 'पाणी'साठी प्रेक्षक जेवढे उत्सुक आहेत तितकीच मी सुद्धा आहे.