COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : टीआरपीसोबतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील रसिक प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेने नुकतंच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर. आधीच राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला राजी झाला आणि त्यात  मुलींपासून ४ हात लांब राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी आल्यामुळे त्याची पळापळ सुरु आहे.


सखीचं पात्र अभिनेत्री रुचा आपटे साकारत आहे. राणाला मॅटवरील कुस्तीचे धडे देणारी सखी प्रेक्षकांनी पाहली आणि ही धाडसी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली. राणाला कुस्तीचे सल्ले देताना ती राणाशी कठोरपणे बोलते वेळ पडली तर त्याचा अपमान देखील करते आणि तिचा हाच स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना भावला. या व्यक्तिरेखेसाठी रुचा मेहनत देखील घेत आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार याच काटेकोर पालन रुचा करतेय.


रुचा हिने साकारलेल्या सखी या पात्राच्या एकंदरीत अनुभवाबद्दल सांगताना रुचा म्हणाली, "सखी ही खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे. एक शहरी मुलगी जी राणाला मॅटवरील कुस्तीचे छक्केपंजे शिकवायला कोल्हापुरात आली आहे. अशी भूमिका मी या आधी कधीही साकारली नाही आहे त्यामुळे ती माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे आणि मी या भूमिकेतून खूप शिकतेय. माझ्या देहबोलीतून कुस्तीपटू साकारणं मी शिकतेय. खूप कमी वेळात मी कुस्तीचं ट्रेनिंग घेतलं आणि ते सीन्समध्ये दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. नुकतेच मालिकेत दाखवल्याप्रमाणे मी राणाला तीन वेळा जमिनीवर पाडते. त्या सीनच्या वेळी राणाने मला सांभाळून घेतलं. त्याला बऱ्यापैकी कुस्ती जमते आणि त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना तो मला सांभाळून घेतो."