Sidharth Shukla death : काय झालं मृत्यूच्या काही तासांपूर्वी, रात्री 3.30 वाजता
सिद्धार्थच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, त्याचा मृत्यू नेमकं कसा झाला याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला आहे
मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं आज अकाली निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या सिद्धार्थचा मृतदेह मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये आहे. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
काय झालं त्या रात्री
मृत्यूच्या आदल्या रात्री सिद्धार्थचे काय झालं याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत. रात्री झोपल्यानंतर सिद्धार्थ 3 ते 3.30 च्या सुमारास उठला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 3 ते 3.30 च्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाची प्रकृती थोडी बिघडली होती. त्याला अस्वस्थ वाटत होतं आणि छातीत दुखत होतं. त्याने आपल्या आईला याबद्दल सांगितलं. सिद्धार्थ शुक्लाच्या आईने त्याला पाणी प्यायला दिलं आणि झोपवलं. पण दुर्देवाने सिद्धार्थ सकाळी उठलाच नाही.
सिद्धार्थच्या आईने त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. पण सिद्धार्थची काहीच हालचाल जाणवत नव्हती. त्यामुळे घाबरेलल्या त्याच्या आईने सिद्धार्थच्या बहिणींना बोलावलं आणि नंतर फॅमिली डॉक्टरला बोलावून घेतलं. यानंतर सिद्धार्थला तात्काळ कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल स्टार्सची श्रद्धांजली
सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक बॉलिवून सेलिब्रेटींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेता सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार, विकी कौशल, वरुण धवन सारख्या स्टार्सनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. सिद्धार्थ शुक्ला हा टीव्हीचा सुप्रसिद्ध अभिनेता होता. त्याने बालिका वधू, दिल से दिल तक सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. खतरों के खिलाडी, बिग बॉस, झलक दिखलाजा या सारख्या रिअॅलिटी शोमध्येही तो झळकला होता.