टीव्ही अभिनेत्रीला हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर
`गंदी बात` वेब सीरिजमध्ये झळकली
मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला (Gehana Vasisth)हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल केलं आहे. अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असून तिला अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये दाखल करण्यात आलं आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने टीव्ही कलाकारांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अभिनेत्री गहनाने खूप वेळ ब्रेक न घेता काम केल्याने, पुरेसा आहार न घेतल्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. गुरूवारी अतिशय गंभीर परिस्थितीत गहनाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. गहनावर मालाडच्या रक्षा रूग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू आहेत.
एका वेब सीरिजची शुटिंग करत असताना गहनाला सेटवर कार्डिऍक अरेस्ट आल्याने ती खाली कोसळली. गहना प्रथमोपचारांना प्रतिसाद देत नसून तिने घेतलेल्या एनर्जी ड्रिंक्समुळे तिच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.
गहना आता एका वेब सीरिजचं शुटिंग करत होती. याअगोदर तिने स्टार प्लसवरील मालिका 'बहनें'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच तिने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये ही काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी गहना 'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये देखील झळकली.