मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री सेजल शर्मा हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतल्या मिरा रोड इथल्या राहत्या घरी सेजल शर्माने शुक्रवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांना सेजलची सुसाईड नोट मिळाली असून या नोटच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. 'दिल तो हॅपी है जी' या मालिकेतून सेजल शर्मा प्रकाशझोतात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेजलच्या आत्महत्या करण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तिच्या खासगी जीवनात असलेल्या काही समस्यांमुळे, मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.  मिरा रोड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


सेजल शर्मा उदयपूर येथील राहणारी होती. 'दिल तो हॅपी है जी' हा तिचा पहिला टीव्ही शो होता. त्याआधी तिने अनेक जाहिराती आणि एका वेब सीरीजमध्येही काम केलं होतं. काही महिन्यांपूर्वीच तिची 'दिल तो हॅपी है जी' ही मालिका बंद झाली होती. 



गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीने देखील आत्महत्या केली होती. मुंबईत त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्ये मागचं कारण अद्याप समोर आलं नाही. कुशलने काही हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. बांद्रा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील चौकशी करत आहेत. या अभिनेत्याच्या आत्महत्येने अनेकांना धक्का बसला होता.