बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचं कारण रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हा व्हिडीओ बनावट असून, मॉर्फ केला असल्याने वाद रंगला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा इंटरनेट, सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांचा मुद्दा समोर आला असून, काहीजणांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनेही या बनावट व्हिडीओची दखल घेतली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री (MoS) राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीव चंद्रशेखर यांनी रश्मिका मंदानाच्या बनावट व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या माहितीचा हानीकारक प्रकार संबंधित प्लॅटफॉर्मद्वारे हाताळला जाणं आवश्यक असल्याची गरज राजीव चंद्रशेखर यांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांची सुरक्षा आणि विश्वास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं आहे". 


राजीव चंद्रशेखर यांनी एप्रिल 2023 मध्ये अधिसूचित आयटी नियमांचा संदर्भ दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आखून दिलेल्या 'कायदेशीर बंधनांचं' पालन करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. राजीव चंद्रशेखर म्हणाले की, "सर्व प्लॅटफॉर्मने 'कोणत्याही वापरकर्त्याद्वारे कोणतीही चुकीची माहिती पोस्ट केलेली नाही याची खात्री करणं आवश्यक आहे. कोणत्याही वापरकर्त्याने किंवा सरकारने अहवाल दिल्यानंतर चुकीची माहिती 36 तासांत काढून टाकली जाते".


"जर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नियमांचं पालन करण्यात अयशस्वी ठरलं तर नियम 7 लागू केला जाईल आणि आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्ती त्या संबंधित प्लॅटफॉर्मविरोधात कोर्टात जाऊ शकते", अशी माहिती राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.


रश्मिका मंदानाचा व्हायरल व्हिडीओ


'पुष्पा' फेम रश्मिका मंदानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. अपलोड झाल्यापासून व्हिडीओला 14 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. एका युजरने हा व्हिडीओ शेअर करताना चिंता व्यक्त केली आहे. असे बनावट व्हिडीओ रोखण्यासाठी आणि कारवाईसाठी कायदेशीर आणि नियामक रुपरेषा आखण्याची तात्काळ गरज असल्याने त्याने म्हटलं आहे. 


हा व्हिडीओ 9 ऑक्टोबरला इंस्टाग्रामला शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओ ब्रिटीश-भारतीय तरुणी झारा पटेल दिसत होती. तिचे 40 हजार फॉलोअर्स आहेत. व्हिडीओ तिने काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचं दिसत असून, लिफ्टमध्ये जात आहे. पण व्हिडीओ झूम करुन पाहिल्यास ती लिफ्टमध्ये जाताच चेहरा बदलून रश्मिकाचा होतो. हा व्हिडीओ नेमका कोणी तयार केला आहे हे अद्याप समजलेलं नाही. 


अमिताभ बच्चन यांनीदेखील या व्हिडीओची दखल घेतली आहे. तसंच याप्रकऱणी अधिक माहिती समोर येण्याची गरज असून कठोर कायदेशीर कारवाईची गरज असल्याचं सांगितलं आहे.