मुंबई : जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच एका अज्ञात इसमाने फोडली आहे. १ ते ३ मे दरम्यान होणाऱ्या नाट्य संमेलनाची माहिती देण्यासाठी ते नगरला गेले होते. माहिती दिल्यानंतर ते जेव्हा परत निघण्यासाठी गाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना आपल्या गाडीची काच कोण्याअज्ञात इसमाने फोडली असल्याचे लक्षात आले. नगरच्या मनमाड मार्गावरील श्रद्धा हॉटेलसमोर ही घटना घडली. त्यानंतर त्यांची गाडी दुरूस्तीसाठी नेण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाय यावेळी मध्यवर्ती नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पत्रकार परिषद देखील आयोजित केली होती. हॉटेल बाहेर अनेक गाड्या उभ्या असताना देखील शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच फडल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे. 


पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप या घटनेला कोणत्याही प्रकारचा दुजोरा देण्यात आलेला नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शरद पोंक्षे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. 


'देश गोडसेवादी की गांधीवादी', 'गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध', असे फलकही यावेळी झळकावण्यात आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतले. 


काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात  ‘मी सावरकर’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पोंक्षे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.