Kangana vs Uorfli Javed: काय हिंदू-मुस्लिम लावलं आहे! Shahrukh Khan वरुन कंगना आणि उर्फी जावेद भिडल्या
पठाण चित्रपटावरुन ट्विटरवर कंगना रणौत आणि उर्फी जावेद आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. कंगनाने एका ट्विटर मत व्यक्त केल्यानंतर उर्फीने हिंदू, मुस्लिम विभाजन करु नये असा सल्ला दिला. यावर कंगनाने समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर बॉलिवूडमध्ये सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. 'पठाण' चित्रपटामुळे वाद झाल्यानंतर त्याचं भवितव्य काय असेल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र शाहरुख खानने सर्व अंदाज खोटे ठरवत अनेक रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. दरम्यान शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर कंगना रणौत आणि उर्फी जावेद भिडल्या आहेत. ट्विटरवर कंगनाने एका ट्विटवर केलेली कमेंट याला कारणीभूत ठरली आहे.
ट्वीटमध्ये काय लिहिलं होतं?
पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की "पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दीपिका, शाहरुख यांचं अभिनंदन! यातून सिद्ध होतं की 1) हिंदू, मुस्लिम शाहरुखवर समान प्रेम करतात 2) बॉयकॉट वादामुळे चित्रपटाला तोटा नाही तर फायदा होतो 3) चांगलं संगीत लोकांना आवडतं 4) भारत सुपर सेक्यूलर आहे".
कंगनाची ट्विटवर प्रतिक्रिया
या ट्विटवर कंगनाने व्यक्त होत आपलं मत मांडलं. "फार चांगलं विश्लेषण....या देशाने सर्व 'खान'वर फक्त प्रेम केलं आहे. तर कधीकधी फक्त त्यांच्यावरच प्रेम केलं आहे. भारतावर द्वेष आणि फॅसिझमचा आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. संपूर्ण जगात भारतासारखा देश नाही," असं कंगनाने त्यावर व्यक्त होताना म्हटलं.
उर्फीची टीका
कंगनाने केलेल्या या ट्विटवर उर्फी जावेदने दोन दिवसांनी व्यक्त होत म्हटलं की, "Oh my gosh ! हे कसलं विभाजन आहे. मुस्लिम अभिनेते, हिंदू अभिनेते. कला ही धर्माने विभागली जात नाही. तिथे फक्त अभिनेते असतात".
कंगनाचं उर्फीला उत्तर -
भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जाहीरपणे समर्थन करणाऱ्या कंगनाने उर्फीला उत्तर दिलं. "होय उर्फी, ते एक आदर्श जग असेल पण समान नागरी कायद्याशिवाय ते शक्य नाही. जोपर्यंत देश संविधानाताच विभागला गेला असेल तोपर्यंत हे असंच राहील. चला नरेंद्र मोदींकडे 2024 च्या जाहीरनाम्यात समान नागरी कायद्याची मागणी करुयात," असं आवाहन कंगनाने केलं आहे.
उर्फीचं उपहासात्मक विधान
यावर व्यक्त होताना उर्फीने युनिफॉर्म माझ्यासाठी एक वाईट कल्पना असेल, मी माझ्या कपड्यांमुळेच प्रसिद्ध आहे असं उपहासात्मक विधान केलं. यानंत तिने स्पष्टीकरण देताना आपण विनोदबुद्धीने ते विधान केल्याचं म्हटलं.