ज्येष्ठ शायर राहत इंदौरी यांचं निधन
वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भोपाळ : जनमानसात अतिशय मानाचं आणि आपलेपणाचं स्थान मिळवणाऱ्या लोकप्रिय शायर राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंदौरी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळं त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होतं.
मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये त्यांना रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राहत इंदौरी यांचा मुलगा सतलज यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर स्वतः राहत इंदौरी यांनी ट्विट करूनही आपण कोरोनाबाधित झाल्याची माहिती दिली होती.
आपण रुग्णालयात असल्याचं सांगच लवकरच मी या विषाणूवर मात करेन अशी प्रार्थना करा, असा अखेरचा संदेश इंदौरी यांनी दिला होता. पण, चाहत्यांच्या या प्रार्थना काम करण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
दरम्यान, इंदौरी यांना दाखल करण्यात आलेल्या Aurobindo Hospital येथील डॉ. विनोद भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ६० टक्के न्युमोनिया झाला होता. मंगळवारीच त्यांना दोनदा हृदयविकाराचे झटकेही येऊन गेले होते.
इंदौरी हे एक लोकप्रिय शायर असण्यासोबतच ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकारही होते. १ जानेवारी १९५० मध्ये इंदौरमधील रफतुल्लाह कुरेशी यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. कापडाच्या गिरणीत ते काम करायचे. त्यांच्या आईचं नाव मकबूल उन निसा बेगम असं होतं. इंदौरमधीलच नूतन विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढं त्यांनी इस्लामिया करिमीया महाविद्यालयातून त्यांनी पदवी आणि बरकतुल्लाह विद्यापीठातून उर्दूमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं होतं.