`उरी` सिनेमाच्या वाढत्या गल्ल्यामुळे तीन सिनेमांच्या रिली़ज डेट रद्द
`उरी` सिनेमा फक्त २८ कोटींच्या निर्मिती खर्चात तयार करण्यात आला आहे.
मुंबई: 'उरी' सिनेमाच्या वाढत्या कमाईमुळे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांचे धाबे दणाणले पाहायला मिळत आहेत. ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'उरी' सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर अजुनही कायम आहे. 'उरी' सिनेमाचा चढता क्रम पाहता सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचा दुसरा सिनेमा 'सोनचिड़िया'ची रिली़ज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आणखी दोन सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक सिनेमा १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता.
उरी....'ने फक्त शंभर कोटींच्या कमाईचा आकडाच ओलांडला नाही, तर २०१९ या वर्षातील तो पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरत असल्याच्या प्रतिक्रीया खुद्द तरण आदर्श यांनी व्यक्त केल्या आहेत. सिनेमा फक्त २८ कोटींच्या निर्मिती खर्चात तयार करण्यात आला आहे. अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री यामी गौतम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या सिनेमाने दहाव्या दिवशी कोट्यवधींच्या कमाईचे शतक पूर्ण केले आहे.
२०१६ मध्ये भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात सर्जिकल स्ट्राईक करत शेजारी राष्ट्राकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिले होते. याच घटनेवर 'उरी...' या सिनोमाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. आता पुढील काही दिवसात 'उरी' सिनेमा किती रुपयांचा आकडा पार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.