ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे.
Shubha Khote Husband Death : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गुरुवारी 28 मार्च रोजी दिनेश बलसावर यांची प्राणज्योत मालवली. शुभा खोटे यांनी याबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
शुभा खोटेंची इन्स्टाग्राम पोस्ट
शुभा खोटे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी काही खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. "गेल्या 60 वर्षांपासून आम्ही एकमेकांना म्हणायचो की सोबत म्हातारे होऊयात. अजून आपल्या आयुष्यात सर्वोत्तम गोष्ट यायची आहे, गुडबाय Soulmate", अशी भावनिक पोस्ट शुभा खोटे यांनी केली आहे.
लेकीची भावनिक साद
त्यासोबतच शुभा खोटे आणि दिनेश बलसावर यांची मुलगी भावना बलसावर हिनेदेखील वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. "अतिशय साहसी आणि धाडसी असलेले दिनेश बलसावर यांनी जगाचा निरोप घेत एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. पण त्यांच्या या प्रवासातील किस्से ते आम्हाला सांगू शकत नाही", अशी भावूक पोस्ट भावनाने केली आहे. भावना बलसावर ही देखील अभिनेत्री असून तिने 'देख भाई देख' या मालिकेत काम केले आहे. दिनेश बलसावर यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा : 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात झळकला 'हा' मराठी अभिनेता, साकारली ब्रिटीश पोलिसांची भूमिका
दरम्यान शुभा खोटे आणि दिनेश बलसावर यांचे लग्न 1960 मध्ये झाले होते. दिनेश बलसावर हे एका कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होते. विशेष म्हणजे त्यांनी 'चिमुकला पाहुणा' या मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती शुभा खोटे यांनी केली होती.