मुंबई : सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाच्या आणि तितक्या संवेदनशील मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत. ट्विटरच्या माध्यामातून व्यक्त होणाऱ्या अख्तर यांचे विचार ऐकून नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही दिल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेबाबत अख्तर यांनी केलेलं ट्विट अनेकांना रुचलं नाही, ज्यामुळे त्यांच्यावर काहींनी आगपाखडही केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'१६ जण एकाच रुळावर, नव्हे तर ते तेथे एका रांगेत झोपलेही होते हे विचार करणंच किती हास्यास्पद आहे.  शक्यता अशीही असू शकते की, चालून चालून थकल्यामुळे मग रेल्वे थांबवण्यासाठी म्हणून ते रुळांवर होते. असं असू शकतं की, रेल्वे चालक वेळीच रेल्वे रोखूच शकला नसेल', असं ट्विट अख्तर यांनी केलं. 


अख्तर यांचं हे ट्विट काही क्षणांतच सोशल मीडिया वर्तुळात असं काही चर्चेत आलं, की नेटकऱ्यांनी त्यावर व्यक्त होत अख्तर यांची रितसर शाळा घेतली. 'साहेब तुम्ही शिक्षण कुठे घेतलं आहे? तालीम म्हणतात नाही का त्याला....', असं लिहित रेल्वेच्या एकूण वेगाचं गणित त्यांना समजावून सांगत खडे बोल सुनावण्यात आले. तर, कोणा दुसऱ्या युजरने ही काही बॉलिवूड चित्रपटातील रेल्वे नसल्याचं म्हटलं. इथे कोणचातरी जीव जातो आणि तुम्ही त्याचं राजकारण करत आहात, किमान शरम बाळगा अशा तीव्र शब्दांत नेटकऱ्यांनी अख्तर यांच्यावर निशाणा साधला. 



वाचा: ...म्हणून रेल्वे रुळावर झोपलो, मजुराने सांगितली 'त्या' रात्रीची व्यथा




अझानविषयी अख्तर म्हणाले.... 


अझानविषयी ट्विट करत त्यांनी यादरम्यान होणारा लाऊडस्पीरकरचा वापर थांबवावा अशी मागणी केली. लोकांना होणारा त्रास अधोरेखित करत त्यांनी लाऊडस्पीरकरचा वापर बंद करण्याची मागणी केली. अख्तर यांचे हे दोन्ही ट्विट पाहता सध्या त्यांना अनेकांच्या रोषाचाच सामना करावा लागत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.