मुंबई : गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचं वास्तव्य असणारी प्रभुकुंज ही इमारत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शनिवारी सील करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून पालिकेकडून ही इमारत सील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. लतादीदी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कुटुंबाकडूनच याबाबतचं अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईतील चंबाला हिल या भागात लता दीदींचं प्रभुकुंज हे निवासस्थान आहे. अधिकृत पत्रकात म्हटल्यानुसार सायंकाळपासूनच अनेकांनी फोन करत कुटुंबाविषयी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये प्रभुकुंज सील झाल्याबाबतही विचारणा होत आहे. या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहोत त्यामुळं सावधगिरी म्हणून पालिकेनं इमारत सील केली आहे. यावेळी आपणा सर्वांनाच अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवाचा हा सणही अतिशय साध्या पद्धतीनं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत साजरा करावा, असं आवाहन मंगेशकर कुटुंबाकडून करण्यात आलं आहे. 


 


सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून होणाऱ्या चर्चा पाहता, आपल्या कुटुंबीयांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही वृत्तांवर प्रतिक्रिया देऊ नका. समाजातील एकोपा लक्षात घेत आपण सारेजण एकमेकांची काळजी घेऊया. मुख्यत्वे घरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेऊया, असं या पत्रकातून स्पष्ट करण्यात आलं. शिवाय देवाची कृपा आणि चाहत्यांचं प्रेम याबाबत आभाराची भावनाही मंगेशकर कुटुंबाकडून व्यक्त करण्यात आली.