PHOTO : `उरी`फेम अभिनेता विक्की कौशल या अभिनेत्रीच्या प्रेमात
नुकतंच एका चॅट शोमध्ये बोलताना विक्की कौशलनं आपण एका मुलीला डेट करत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं
मुंबई : सर्जिकल स्ट्राईकवर आधारित सिनेमा 'उरी'ला मिळालेला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादानंतर अभिनेता विक्की कौशलला एक वेगळी ओळख मिळालीय. विक्कीच्या फिमेल फॉलोईंगही जोरात वाढताना दिसतंय. पण, कदाचित या तरुणींचं मन मोडण्याची शक्यता आहे... कारण विक्की कौशल ज्या मुलीला डेट करतोय तिचं नाव आणि फोटोही समोर येतोय. विक्की कौशल अभिनेत्री हरलीन सेठी हिच्यासोबत सध्या प्रेमाची गाणी गातोय. हरलीननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विक्कीसोबत एक फोटो शेअर केलाय.
नुकतंच एका चॅट शोमध्ये बोलताना विक्कीनं आपण एका मुलीला डेट करत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. परंतु, या मुलीची ओळख मात्र त्यानं जाहीर केली नव्हती. पण आता मात्र हरलीननं शेअर केलेल्या फोटोनंतर 'ती मुलगी कोण?' या प्रश्नाचं उत्तर विक्कीच्या चाहत्यांना सापडलंय.
हरलीन एक अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी तिची एक वेब सीरिज 'ब्रोकन' प्रदर्शित झाली होती. या वेब सीरिजसाठी हरलीन हिला बेस्ट डेब्यू फिमेल अवॉर्डही मिळालंय.
हरलीन आणि विक्कीनं सोबतच 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमाचं यश साजरं केलं. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचं एक टी-शर्ट परिधान केलं होतं. त्यावर लिहिलं होतं 'हाऊज द जोश' आणि हरलीननं या फोटोला कॅप्शन दिला 'हाय सर'
हरलीन आणि विक्कीची ओळख एका कॉमन मित्राच्या पार्टीत झाली होती. पण विक्की मात्र या पार्टीत दुसऱ्याच एका मैत्रिणीला भेटायला गेला होता. विक्की त्या पार्टीत मैत्रिणीचा कॉलच उचलू शकला नाही आणि त्याला हरलीन पसंत पडली होती. हरलीन आणि विक्की गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.