नालासोपारा ते अमेरिका : `या` डान्स ग्रुपचा `वर्ल्ड ऑफ डान्स`मध्ये डंका
या ग्रुपमधली मुलं ही १७ ते २७ वयोगटातली असून ही सर्व मुलं वसई, नालासोपार भागात राहतात
मुंबई : मुंबईतील वसई-नालासोपारा भागातील 'द किंग्ज' हा डान्स ग्रुप सध्या जागतिक पातळीवर चर्चिला जात आहे. अमेरिकेतील 'वर्ल्ड ऑफ डान्स' या कार्यक्रमात 'किंग्ज युनायटेड' या १५ मुलांच्या ग्रुपने विजेतेपद पटकावून वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. या मुलांना मानचिन्ह आणि एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आलं. अमेरिकेत रविवारी ही अंतिम फेरी पार पडली. या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच या ग्रुपने प्रेक्षकांची आणि परिक्षकांची मन जिंकली होती. अंतिम फेरीत नालासोपाराच्या या ग्रुपचा सामना रंगला तो कॅनडा, फिलिपाईन्स, दक्षिण कॅलिफोर्निया यांच्याशी... मात्र या स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवत 'द किंग्ज' या ग्रुपने विजेतेपद पटकावलं. या ग्रुपमधली मुलं ही १७ ते २७ वयोगटातली असून ही सर्व मुलं वसई, नालासोपार भागात राहतात.
'वर्ल्ड ऑफ डान्स' या कार्यक्रमात जेनेफर लोपेझ, ने-यो आणि डेरेक हॉग हे तिघे परिक्षक म्हणून काम पाहतात. या रिऍलिटी शोचे विजेते म्हणून 'द किंग्ज'ला तब्बल १ दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस मिळालंय. या ग्रुपवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेता ऋतेश देशमुख यांनीही सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव केलाय.
'द किंग्ज'बद्दल थोडंसं...
- सुरेश मुकुंद आणि वर्नान मॉन्टेरिओ यांनी २००९ साली हा डान्स ग्रुप स्थापन केला होता
- अगोदर याच ग्रुपचं नाव होतं 'फिक्सिशिअस डान्स ग्रुप'
- बुगी-वुगी, एन्टरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा आणि इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमांतही या ग्रुपनं सहभाग नोंदवला होता
- २०१२ साली 'वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशीप'मध्ये किंग्ज युनायटेड फायनलपर्यंत पोहचले होते. तर २०१५ साली त्यांनी याच स्पर्धेत 'ब्रॉन्झ' मेडल पटकावलं होतं
- उल्लेखनीय म्हणजे, याच ग्रुपनं आपल्या कामातून रेमो डिसूझाला 'एबीसीडी २' बनवण्यासाठी प्रोत्साहीत केलं होतं.
- आयपीएल २०१६ च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये या ग्रुपचा डान्स पाहायला मिळाला होता