...म्हणून विद्या बालन `परिणीता`च्या आठवणीत मग्न
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दिवस असतो...
मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक दिवस असतो, ज्यामुळे संपूर्ण जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळते आणि तो एक दिवस आयुष्यातील सोनेरी दिवस म्हणून आठवणीत राहतो. असंच काहीसं घडलंय बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत. विद्याने १० जून २००५ साली प्रदर्शित झालेल्या 'परिणीता' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. आज या गोष्टीला १५ वर्ष लोटली आहेत. कोलकाता शहरातील परंपरेचं दर्शन घडवणारा हा चित्रपट शरतचंद्र यांच्या कथेवर आधारलेला आहे. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत . सध्या १५ वर्षांपूर्वीचे विद्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'परिणीता' चित्रपटातील सर्व कलाकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात विद्या बालन, संजय दत्त, सैफ अली खान, राइमा सेन, दिया मिर्जा कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती. 'परिणीता' चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी विद्याने टीव्ही आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात अधिराज्या गाजवले आहे.
दरम्यान अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक भूमिका पार पाडल्यानंतर आता चाहते विद्याचा आगामी शकुंतला देवी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. गणिततज्ज्ञ 'शकुंतला देवी', या चित्रपटातून विद्या आणि जीशू दुसऱ्यांदा एकत्र झळकणार आहेत. या माध्यमातून एका असामान्य व्यक्तीमत्वाच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.
शकुंतला देवींचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरूमध्ये झाला. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.