मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हा सिनेमा येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वी दिग्दर्शक निखिल आडवाणीचा हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमाचं आणखीन एक नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 'रुला दिया' हे गाणं इंटरनेटवर पसरतंय... महत्त्वाचं म्हणजे, हे भावनिक गाणं प्रेक्षकांनाही साद घालतं. बॉलिवूड गायक अंकित तिवारी आणि ध्वनी भानुशाली यांच्या आवाजातील हे गाणं प्रेक्षकांच्या मनातही उतरतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूट्यूबवर या गाण्याला आत्तापर्यंत २९ लाखहून अधिक वेळा पाहिलं गेलंय. हे गाणं थेट हृदयाला भिडत असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. 



जॉन अब्राहमचा हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. ११ वर्षांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये एन्काऊंटरची घटना घडली होती. १९ सप्टेंबर २००८ मध्ये जामिया नगरच्या बाटला हाऊसमध्ये आतिफ अमीन आणि मोहम्मद साजित हे दोन संशयित दहशतवादी ठार झाले होते. हे दोघे दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनसाठी काम करत होते. त्यांचे दोन साथीदार मोहम्मद सैफ आणि जीशान यांना अटक करण्यात आली तर त्यांचा एक साथीदार आरिज खान हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. 


या सिनेमात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॉनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसतेय. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रोमियो, अकबर, वॉल्टर' या सिनेमात जॉन अब्राहमनं एका 'रॉ' एजन्टची भूमिका निभावली होती.