आईनं अखेरचा श्वास घेतला, कळलंच नाही; पाहा जॅकी श्रॉफ यांच्या भावनांचा बांध फुटला, बिग बींना अश्रू अनावर
सुनील शेट्टीनं सांगितली काळीज पिळवटणारी आठवण...
मुंबई : सर्वसामान्यांना कोट्यधीश होण्याची स्वप्न दाखवणारा एक कार्यक्रम म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' (KBC 13). बिग बी, महानायक अमिताभ बच्चन यांचं आपल्याच शैलीतील सूत्रसंचालन या कार्यक्रमाला चार चाँद लावून जातो. दर शुक्रवारी या खास कार्यक्रमात कोणा एका सेलिब्रिटी स्पर्धकाची हजेरी असते. अशातच यावेळी कार्यक्रमातील हॉट सीटवर आले आहेत, दिलखुलास अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी.
दोन्ही कलाकारांच्या साथीनं कार्यक्रम सुरु असतानाच एक वळण असं आलं जिथं अमिताभ, जॅकी दा आणि सुनील शेट्टी या तिघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. जॅकी श्रॉफ यांच्या जीवनातील एका प्रसंगाबाबत सांगणाऱ्या सुनील शेट्टीचा व्हिडीओ केबीसीच्या मंचावर लावण्यात आला. 'दादा (जॅकी श्रॉफ)नं खुप सुरेख उल्लेख केला होता. जेव्हा एका खोलीच्या घरात राहत होतो, तेव्हा आईला खोकला आला तरीही एकू येत होता. जेव्हा मोठ्या घरात गेले, तेव्हा मात्र आईनं अखेरचा श्वास घेतलेला, ती कायमची गेलेली हेसुद्धा कळलं नाही', असं त्या व्हिडीओमध्ये म्हटलं गेलं होतं.
व्हिडीओ सुरु झाला त्या क्षणापासून जॅकी दा आणि सुनील शेट्टी यांचे डोळे पाणावले होते. जॅकी श्रॉफ यांनातर हे सारंकाही सहन झां नाही आणि ते ढसाढसा रडले. तिथं समोरच्या दोन्ही कलाकारांना पाहून अमिताभ बच्चन यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.
आईच्या निधनाची माहिती आपल्याला उशिरा मिळाली. अन्यथा आईचा जीव वाचवता आला असता असं जॅकी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. पण, नियतीपुढे साऱ्यांनीच हात टेकले आणि त्यांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं.