Satish Kaushik Death Reason: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik)  यांचं निधन झालं आहे. 66 वर्षीय सतीश कौशिक यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक दिल्लीत आपल्या फार्महाऊसवर असताना अचानक प्रकृती ढासळली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण रस्त्यातच त्यांनी आपला जीव गमावला. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम पाहता संशय व्यक्त केला असून शवविच्छेदन केलं आहे. तसंच व्हिसेरा (viscera report) काढून पुढील तपासणीसाठी जपून ठेवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतीश कौशिक यांचं निधन कसं झालं यादृष्टीने पोलीस सर्व बाजू पडताळून पाहत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी शवविच्छेदन केलं असता यामध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानेच मृत्यू झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. पण पोलिसांनी पुढील तपासासाठी मृतदेहाचा व्हिसेरा जपून ठेवला आहे. व्हिसेराच्या माध्यमातून मृत्यूचं खरं कारण समोर येईल. पण हा व्हिसेरा रिपोर्ट म्हणजे नेमकं काय असतं? ही चाचणी कशी केली जाते? तसंच याचं कायदेशीर महत्त्व काय आहे? हे समजून घ्या. 


मृतदेहाचा व्हिसेरा केव्हा काढला जातो?


एखाद्याच्या मृत्यूनंतर हत्येचा संशय असेल तर अशा स्थितीत व्हिसेरा चाचणी केली जाते. अनेकदा शवविच्छेदनातूनही नेमका मृत्यू कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होत नाही. अशा स्थितीत मृतदेहाचा व्हिसेरा जपून ठेवला जातो. प्रसिद्ध लोकांच्या मृत्यूनंतर अनेकदा वाद निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत मृत्यूचं खरं कारण समोर येऊन तो वाद निर्माण होऊ नये यासाठी हा प्रयत्न असतो. 



शवविच्छेदनासाठी घेतलेल्या नमुन्यांची चाचणी 15 दिवसांच्या आत करणं अनिवार्य असतं. अन्यथा त्यातून कारण समजणं कठीण असतं. मृत व्यक्तीचं रक्त, वीर्य यांचीही तपासणी केली जाते. 



कायदेशीर आधार काय?


व्हिसेरा रिपोर्टला कायदेशीर मान्यता आहे. पुरावा म्हणून व्हिसेरा रिपोर्टला ग्राह्य धरलं जातं. व्हिसेरा रिपोर्टमध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरिरात केमिकल आढळलं असेल तर तो मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचं जाहीर करु शकत नाही. सुप्रीम कोर्टाने 21 जानेवारी 2014 मध्ये एका निर्णयात संशयित मृत्यू प्रकरणात व्हिसेरा चाचणी करणं तपास यंत्रणांसाठी अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं.