मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा नृत्यात पारंगत अभिनेत्रींचा काळ होता. जया प्रदा, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, मीनाक्षी शेषाद्रीसारख्या अभिनेत्री शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध होत्या. आंध्र प्रदेशच्या रहिवासी असलेल्या जया प्रदा यांना फक्त त्यांच्या नृत्यामुळे चित्रपटात ऑफर मिळायच्या. जया यांच्या आईने लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि संगीत शिकवायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की, एकदा जया त्यांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात डान्स करत होत्या. तेव्हा तिथे आलेल्या एका चित्रपट दिग्दर्शकाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांना जया यांचं सौंदर्य आणि नृत्य इतकं आवडलं की, त्यांनी त्यांच्या 'भूमी कोसम' या तेलुगु चित्रपटात डान्स करण्याची संधी दिली. ईथून जया यांचं फिल्मी करिअर सुरू झालं. तेलुगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर जया यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया प्रदा यांनी जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं तेव्हा परवीन बाबी, राखी, झीनत अमान यासारख्या त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींची जादू ओसरू लागली होती. 1979मध्ये चित्रपट निर्माते-दिग्दर्शक के विश्वनाथ यांनी जयाप्रदा यांच्यासोबत 'सरगम' चित्रपट बनवला. हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि जया एका रात्रीत स्टार बनल्या. जया त्यांच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत घ्यायच्या. कोणत्याही परिस्थितीत त्या कधी अस्वस्थ झाल्या नाहीत. 


आजच्यासारखी त्यावेळी कोणतीही सुविधा आणि तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग करताना लोकेशन आणि वेळेची खूप काळजी घ्यावी लागायची. अशा परिस्थितीत अभिनेत्रीलाही बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागायचा. जया प्रदा यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'डफलीवाले'. जया प्रदा आणि ऋषि कपूर यांच्या जोडीचं या चित्रपटातील 'डफलीवाले डफली बजा...' या गाण्याने धुमाकुळ घातला. या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, त्या काळातील अभिनेत्री कोणत्या परिस्थितीत काम करायच्या.


जया प्रदा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'एकदा मला ट्रेनमध्ये आंघोळ करावी लागली. कारण त्या ठिकाणी पोहचताच आम्हाला शूट करायचं होतं. दिग्दर्शकांना पहाटे पहिल्या उजेडात सीन शूट करायचा होता. मी चोवीस तास काम करत होते. मी माझा स्वतःचा मेकअप स्वतः करायला शिकले. चित्रपटाच्या मागणीनुसार आम्हाला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जावं लागलं. आम्ही कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत शूट केलं आहे. आज जेव्हा मी ऐकते की, व्हॅनिटी व्हॅन नसल्यामुळे मुली सहकार्य करत नाहीत, तेव्हा मला आश्चर्य वाटलं.


बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा त्यांच्या काळातील टॉपच्या अभिनेत्री होत्या. 'तोहफा', 'औलाद', 'शराबी', 'मवाली' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी एक विशेष स्थान निर्माण केलं.