मुंबई : हल्ली कलेच्या विविध रुपांना कलाकारांची जोड असली की मग रसिक प्रेक्षकांना भाषेच्या किंवा संस्कृतीच्या भींती कधीच आड येत नाहीत. बरंच आधीपासूनचा संदर्भ घेतल्यास अगदी तामिळ आणि मल्याळम गीतांना हिंदी आणि मराठी भाषिकांची चांगलीच पसंती मिळाली. तर, यामध्ये गुजराती  आणि इंग्रजी भाषांतील गाणीही मागे राहिली नव्हती. याच गाण्यांच्या गर्दीत सध्या गाजतंय ते म्हणजे मणिके मांगे हिथे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करोडोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळालेलं हे गाणं गायलं आहे, श्रीलंकन गायिकेनं. योहानी डीसिल्वा असं या गायिकेचं नाव. श्रीलंकेतील कोलंबो येथे राहणारी योहानी गायिका, गीतकार आणि संगीतकारही आहे. तिनं आपल्या करिअरची सुरुवात युट्यूबच्याच माध्यमातून केली होती. 


श्रीलंकेत ती रॅप प्रिन्सेस या नावानं ओळखली जात होती. आता मात्र योहानीची एक वेगळीच ओळख तयार झाली आहे. हे गाणं मूळ सिंहली भाषेत लिहिलं गेलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या गाण्याचे अनेक व्हर्जनही सादर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. 


तुम्हाला माहितीये का, योहानीनं गायलेलं आणि कमालीचं गाजणारं हे गाणंही रिक्रिएटेड व्हर्जन आहे. याचं मुळ गाणं 2020 जुलै महिन्यात Satheeshan आणि दुलान एआरएक्सनं सादर केलं होतं. ज्यानंतर 2021 मध्ये योहानीने हे गाणं तिच्या शैलीत सादर करत त्याला चार चाँद लावले. 




युट्यूब आणि विविध अॅप्सवर असणाऱ्या रिल्सच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या गाण्यानं सर्वांनाच भुरळ पाडली आहे. भारतातून मिळणाऱ्या या लोकप्रियतेसाठी योहानीनं सर्वांचेच आभार मानले आहेत. किंबहुना तिला या साऱ्याचं बरंच अप्रूप वाटत आहे.