Video : 5 दिवसात 2,112,295 व्ह्यूज; हातावर मेंदी काढून सतारीच्या स्वरांनी मंत्रमुग्ध करणारा हा तरुण आहे तरी कोण?
हा साक्षात देवासाठीच गातोय आणि वादन करतोय... म्हणत नेटकरी वारंवार ऐकत आहेत या तरुणाची गाणी. स्टेटसवरही ठेवतायत याचेच रील
Rishab Rikhiram Sharma shiv kailash sitar : सोशल मीडियावर इन्स्टा किंवा युट्यूब सुरू केलं, की तिथं शॉर्ट्स आणि रीलमध्ये जाऊन आपल्या आवडीचे किंवा समोर येईल ते रील पाहण्याला अनेकांचीच पसंती असते. यातूनच काही अशा गोष्टी व्हायरल होतात ज्या एक प्रेक्षक म्हणून सर्वांनाच भारावून सोडतात. अशीच एक उत्तम कलाकृती सध्या नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करताना दिसत आहे.
इथं एक तरुण सतारवादन करत आणि त्याच्या सुरेख स्वरांनी शिव कैलाश... गीत सादर करत जणू साक्षात शंकरालाच आळवत आहे. चाणक्यची धुन ऐकवताना त्यानं छेडेला प्रत्येक स्वर जणू आसमंताशी एकरुप होऊ पाहत आहे. कोट्यवधी व्हूज मिळवणारा आणि नेटकऱ्यांच्या गळ्यातील ताईत झालेला हा तरुण आहे, रिषभ रिखिराम शर्मा.
सतारवादनाला एका वेगळ्या स्तरावर नेत मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांत असणारा रिषभ त्याच्या या कलेच्या मदतीनं मानसिक आरोग्यासंदर्भातील जनजागृतीसुद्धा करताना दिसत आहे. Sitar For Mental Health या उपक्रमाअंतर्गत तो देशविदेशात कार्यक्रम करतो. अगदी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्येही रिषभनं त्याची कला सादर केली आहे.
हातांवर मेंदी काढत अतिशय सुरेख पद्धतीनं कला आणि मानसिक आरोग्याची सांगड घालण्याचं शिवधनुष्य तो लिलया पेलताना दिसत आहे. सतार वादनातील परमोच्च शिखरावर असणारे शिरोमणी स्वर्गीय पंडित रवी शंकर यांचा हा शिष्य. वयाच्या 10 व्या वर्षापासून रिषभ सतारवादनाकडे वळला आणि त्याच्यातील कलाकार पाहून खुद्द पंडित रवी शंकर यांनी त्याला आपल्या छत्रछायेखाली घेत सतारवादनाचे धडे दिले. आज वयाच्या 26 व्या वर्षी रिषभ असा काही प्रसिद्धीझोतात आला, की अनेकांच्याच तोंडावर त्याचं नाव पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया फीडवर येणारा प्रत्येक दुसरा व्हिडीओ हा रिषभचाच असून, त्याची कला प्रत्येक वेळी काहीतरी नवा नजराणा सर्वांपुढं सादर करत थेट मनाचाच ठाव घेताना दिसत आहे.
रिषभ सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, तो युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॉलोअर्सच्या संपर्कात आहे. याच माध्यमातून त्याचे सतारवादनाचे कैक व्हिडीओ शेअर करण्यात येत असून, तो या निमित्तानं मानसिक आरोग्यासाठी सतारीचे कार्यक्रम विनामूल्य सादर करताना दिसतोय.