जेव्हा बिग बी सिंधुताईंपुढे नतमस्तक होतात....
एका व्यक्तीच्या खास शुभेच्छा
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या यशामागे आजवर अनेक व्यक्तींचा आशीर्वाद आहे, असं ते स्वत: सांगतात. यातच आता आणखी एका व्यक्तीच्या खास शुभेच्छा दशकातील या महानायकाला मिळाल्या आहेत. ती खास व्यक्ती कोण आहे, हे 'केबीसी ११' म्हणजेच 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या नव्या भागात पाहता येणार आहे.
ती व्यक्ती इतकी खास आहे, की कार्यक्रम सुरु असताना अमिताभ बच्चन स्वत: त्यांच्या आसनावरुन उठले आणि समोर स्पर्धक म्हणून बसलेल्या त्या व्यक्तीपुढे नतमस्तक झाले. त्या व्यक्तीचं नाव आहे सिंधुताई सपकाळ. 'अनाथांची माय', म्हणून साऱ्या विश्वात ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताईंच्या कार्याची उंची पाहता आपण त्यांच्यापुढे अगदी लहान असल्याची भावना ज्याप्रकारे सर्वांच्याच मनात घर करते, त्याचप्रमाणे, बिग बींच्या मनातही ही भावना होती.
सिंधुताईंची गुलाबी रंगाच्या साडीलाच पसंती का?
केबीसीच्या मंचावर विविध प्रश्नांची उत्तरं देत आणि चर्चा करत असतानाच अमिताभ बच्चन यांनी सिंधुताईंना त्यांच्या पेहरावाविषयी, गुलाबी रंगांच्या साड्यांवरील प्रेमाविषयी काही खास माहिती विचारली. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, 'मी आजवर बराच काळोख पाहिला आहे. त्यामुळे आता जीवनाच्या या टप्प्यावर थोडा गुलाबी रंग यावा म्हणूनच ही गुलाबी साडी.' त्यांचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा एकच वर्षाव केला.