कोणाच्या सांगण्यावरून Lata Mangeshkar यांनी गायलं होतं भोजपुरी गाणं?
लता मंगेशकर नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा पहिल्यांदा विचार करत असतं. कदाचित याच कारणाने लता दीदींनी एका व्यक्तीचं ऐकून भोजपूरी गाणं गायलं होतं.
मुंबई : आज संपूर्ण देशभर शांतता आहे. आजच्या दिवसाच्या सकाळीच सर्व देशवासियांना दुःखद बातमी समजली. म्यूझिक इंडस्ट्रीची शान मानल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचं निधन झालंय. लता मंगेशकर जितक्या चांगल्या गायक होत्या तितक्याच त्या चांगल्या व्यक्तीही होत्या. त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकांनी सांगितलंय की, लता मंगेशकर नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा पहिल्यांदा विचार करत असतं. कदाचित याच कारणाने लता दीदींनी एका व्यक्तीचं ऐकून भोजपूरी गाणं गायलं होतं.
काय आहे हा किस्सा?
1950 ची ही गोष्ट आहे. यावेळी राजेंद्र प्रसाद यांना देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. राष्ट्रपती झाल्यानंतर ते अधिकतर वेळ सदाकत आश्रमात घालवत असत.
यावेळी राष्ट्रपतींकडे काही लोकांनी भोजपुरी सिनेमे बनवण्याची मागणी केली. राजेंद्र प्रसाद यांनी देखील यावर विचार केला. याच दरम्यान ते एका कार्यमासाठी मुंबईत आले होते. या ठिकाणी त्यांची भेट नाजिर हुसैन यांच्याशी झाली. यावेळी त्यांनीही राष्ट्रपतींकडे भोजपुरी सिनेमांची शिफारस केली. अखेर राष्ट्रपतींनी भोजपुरी फिल्मसाठी परवानगी दिली.
हा पहिला भोजपुरी सिनेमा बनत असल्याने तो यशस्वी व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात होते. फिल्म मेकर्सच्या सांगण्यानंतर राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सिनेमात गाणं गाण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी राष्ट्रपतींना लता दीदी नाकारू शकल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी भोजपुरी फिल्मचं टायटल ट्रॅक 'गंगा मैया तोहे पियरी चढ़इबो' हे गाणं गायलं.
1963 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट हिट ठरला आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं देखील. या गाण्यानंतर लहान गावातील आणि शहरातील लोकंही लता दीदींना ओळखू लागले.