लग्नाआधीच साक्षी झाली आई; 49 व्या वर्षापर्यंत का राहिली अविवाहित?
एका मुलाखतीत साक्षीनं आपल्या अविवाहित असण्यासंबंधीच्या प्रश्नांवर उत्तरं दिली.
मुंबई : 'कहानी घर-घर की', 'बड़े अच्छे लगते हैं' अशा मालिकांच्या माध्यमातून अभिनेत्री साक्षी तंवर चाहत्यांच्या भेटीला आली. पाहता पाहता साक्षीनं आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडली. सहसा प्रकाशझोतापासून दूर राहणाऱ्या साक्षीनं कायमच तिच्या कृतींतून आणि निर्णयांतून या प्रकाशझोतालाच आपल्या दिशेनं आकर्षित केलं.
ऑनस्क्रीन भूमिकांनी सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्रीनं आपला जोडीदार निवडला की नाही, हाच प्रश्न सर्वांच्या मनात होता.
त्याचं उत्तर मात्र वेळोवेळी नकारार्थीच मिळालं. वयाच्या 49 व्या वर्षीही साक्षी अविवाहितच आहे.
लग्न न करताच तिनं मातृत्त्वंही स्वीकारलं आहे. एका मुलाखतीत साक्षीनं आपल्या अविवाहित असण्यासंबंधीच्या प्रश्नांवर उत्तरं दिली.
तिनं गुपचूप लग्न केल्याच्या अफवांनीही जोर धरला, जे पाहून साक्षी म्हणाली, 'लग्नाच्या या चर्चा निव्वळ अफवा आहेत. मला रिलेशनशिपमध्ये येण्यास काहीच अडचण नाही', असं ती म्हणाली.
मला असं कोणी भेटलंच नाही, ज्याच्याशी मी लग्न करु शकेन. सहसा लोकं प्रेम शोधतात. पण, माझ्या बाबतीत मात्र प्रेमालाच माझ्यापर्यंत यावं लागेल, अशा शब्दांत तिनं चित्र स्पष्ट केलं.
साक्षीनं आपलं मत मांडताना एक सुंदर विचारही सर्वांसमोर ठेवला.
'माझ्या मते जन्म, लग्न अशा गोष्टी या पूर्वनियोजित असतात. माझा विवाहसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
किंबहुना माझ्या कुटुंबातही यशस्वी लग्नाची उदाहरणं आहेत', असं ती म्हणाली.
लग्न म्हणजे एकदुसऱ्याची साथ देणं, यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा असणं अपेक्षितच नाही हा विचार तिनं सर्वांसमोर ठेवला.
आपण लग्न केलं नाही, याचा अर्थ आपण आनंदी नाही असा होत नाही हे साक्षीकडे पाहताना लगेचच लक्षात येतं.