दमदार स्टारकास्ट असलेला मराठी `शोले` लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
`हजारवेळा शोले पाहिलेला माणूस` या चित्रपटाच्या नावातूनच `शोले` या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं. या नावामुळेच आता या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली असून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मुंबई : असे काही सिनेमा असतात. जे येतात आणि प्रेक्षकांच्या मनावर कायम स्वरुपासाठी आपलं नाव कोरतात. असेच काही जुने सिनेमा आहेत जे आजही आणि आजच्या पिढीलाही कायम लक्षात आहेत आणि तितकेच लोकप्रियदेखील आहेत. याच यादीतला सगळ्यात महत्वाचा सिनेमा म्हणजे शोले. हा सिनेमा असो किंवा मग या सिनेमातील गाणी असो किंवा मग यातील डायलॉग्स असो किंवा स्टारकास्ट असो. हा सिनेमा सगळ्याच बाजूने हिट ठरला होता. आता तुम्ही म्हणाल, या सिनेमा विषयी आम्ही आज का बोलत आहोत. तर यामागचं कारण म्हणजे गाजलेला हा सिनेमाचं कनेक्शन आता एका मराठी सिनेमासोबत असणार आहे. लवकरच "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हिंदी चित्रपटाच्या इतिहासात "शोले' हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदललं, अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच "शोले" या चित्रपटाच्या महानतेला "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. नुकतंच मुंबई फेस्टिवल येथे या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं होतं.
राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतुन आपल्या भेटीस येणार आहेत.
"हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाच्या नावातूनच "शोले" या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं, पण चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शोले चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच "शोले" चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. "शोले" चित्रपटाच्या याच आठवणींना "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा चित्रपट सलाम करणार आहे.